कोल्हापूर : जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेल्या अँन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या अँन्टेजेन टेस्टिंग सेंटरचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, शिरोळचे नगराध्यक्ष डॉ. अमरसिंह माने-पाटील, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार, गटविकास अधिकारी कवितके, डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विजय मगदूम, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खटावकर यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स तसेच आरोग्य विभागाकडील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, जिल्ह्ययात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या शासकीय टेस्टिंग लॅबवरती स्वॅब तपासणीसाठी ताण पडत आहे.
कोरोना चाचणी सॅम्पल्स वाढल्यामुळे रुग्णांना तातडीने रिपोर्ट देणे आणि उपचार करणे गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे आरोग्य विभागाने राज्यात अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली असून जयसिंगपूर येथे डॉ.जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेले अँन्टेजेन टेस्टिंग सेंटर याचाच भाग आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पी-पाटील म्हणाले, आरोग्य विभागाच्यावतीने या ठिकाणी विनामूल्य सेवा दिली जाणार आहे, अगदी कमी वेळेमध्ये कोरोनाचे निदान होण्यासाठी या टेस्टिंग सेंटरचा उपयोग होईल.
या सेंटरमुळे आरोग्य प्रशासनावरील ताण कमी होऊन नागरिकांना अल्पावधीत टेस्टिंगचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे कोरोना बाबतची प्राथमिक लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने या टेस्टिंग सेंटरमध्ये संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.