कोल्हापूर : कोल्हापूरच्या ८ वर्षे ८ महिने वयाच्या अनुप्रिया अमितकुमार गावडे हिने भारतीय घटनेतील प्रस्तावनेसह भाग एक, दोन, तीनमधील ३५ कलमे व उपकलमे केवळ ६ मिनिटे १० सेकंदात पठण केली. तिच्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती वडील अमितकुमार गावडे यांनी दिली.तिने हा उपक्रम २३ सप्टेंबर २०२० ला केला. त्याचे चित्रीकरण ऑनलाईन पद्धतीने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला सादर केले. त्याची दखल घेत एशिया बुक ऑफ रेकॉर्डने तिला ह्यग्रँड मास्टरह्ण हा किताब बहाल केला. अशाप्रकारे विक्रम प्रस्थापित करणारी ती एकमेव भारतीय ठरली आहे. अनुप्रिया ही बोंद्रेनगरातील गंधर्वनगरीत राहणाऱ्या अमितकुमार व प्रा. अक्षता गावडे यांची कनिष्ठ कन्या आहे.
तिने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये दोन सुवर्ण, राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये रौप्य, राष्ट्रीय सायबर ऑलिम्पियाडमध्ये रौप्य, आय क्यू परीक्षेत सुवर्ण, गणित ऑलिम्पियाडमध्ये गुणवत्तेसह शिष्यवृती, बी.डी.एस. परीक्षेत सुवर्ण व रौप्य अशा विविध स्पर्धेत तिने यश मिळविले आहे. या कामगिरीबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. अनुप्रिया शांतिनिकेतन स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकते. तिला आई-वडिलांसह संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, संचालिका राजश्री काकडे, यांच्यासह प्राचार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.