कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिने त्रिवेंद्रम् येथे सुरू असलेल्या ६१ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सांघिक तीन रौप्यपदकांची कमाई केली. तिने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात यश मिळविले.
महिलांच्या ज्युनिअर दहा मीटर पिस्तूल प्रकारात तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत हर्षदा निटवे, पूर्वा गायकवाड यांच्या साथीने ११२० गुण मिळवत रौप्यपदक पटकाविले. दहा मीटर पिस्तूल यूथ गटातही अनुष्काने सांघिक रौप्यपदक मिळविले. त्रिवेंद्रम् येथे सुरू असणाºया या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील सुमारे ४८०० पुरुष आणि महिला नेमबाज सहभागी झाले होते.
या स्पर्धेपूर्वीच अनुष्काला नुकतीच जपानमध्ये झालेल्या दहाव्या आशियाई स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. ज्यात तिने सांघिक चौथे स्थान प्राप्त केले. अनुष्का हिच्या नेमबाजीतील या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया स्कूल गेम’साठी ‘एनआएआय’ने जाहीर केलेल्या यादीमध्ये तिने आपले स्थान निश्चित केले आहे. ती क्रीडा प्रबोधिनीच्या छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात सराव करते. ती विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून दहावीच्या वर्गात शिकत आहे.
तिला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य माणिकराव वाघमारे, प्रशिक्षक अजित पाटील, युवराज साळोखे, शाळेचे अध्यक्ष लोहिया, सायली जोशी, योगेश माने, विनय पाटील, जितेंद्र विभूते यांचे मार्गदर्शन लाभले.