कोल्हापूर : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या बदललेल्या वातावरणाने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढवली आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप आलेल्या रुग्णांच्या मनात कोरोनाची भीती दाटली आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. टुकटा हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकेल असे हवामान खाते सांगत असले तरी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसह कोल्हापुरातही त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. बुधवारी अंशत: ढगाळ वातावरण होते. गुरुवारी तर सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. उन्हाचा तडाखा नसला तरी उष्म्यामुळे अस्वस्थता आणि घामाच्या धारा कायम होत्या. हे तापमान मानवी शरीरास हानिकारक असल्याने सध्या थंडी वाजून ताप येणे, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी या आजारांनी डोके वर काढले आहे. ही कोरोनाची देखील लक्षणे असल्याने ताप आलेल्यांना कोरोनाची भीती सतावू लागली आहे.
दरम्यान जिल्ह्यात उन्हाळी पिकांची कापणी, मळणी जोरात सुरू आहे. वादळाच्या भीतीने शेतकऱ्यांची शिवारात धांदल उडाली असून प्रचंड उष्मा असतानाही हातातोंडाशी आलेले पीक पावसाआधी घरात आणण्यासाठीची गडबड सुरू आहे. भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफुलासह मुग, उडीद, तीळ यांची काढणी सध्या सुरू आहे. पीक मोठ्या पावसाने जमिनीवर आडवे झाले तर तीन- चार महिन्यांपासून केलेल्या कष्टावर पाणी फिरेल म्हणून शेतकरी आहे त्या घातीला पीक काढणीत व्यस्थ आहेत.
चौकट
आठवडा पावसाचाच
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील आठवडाभर हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
चौकट
नव्या पेरणीसाठी शिवारात मशागतीची धांदल
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भात व नाचणीचे तरवे टाकले जातात. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. भाताची धूळवाफ पेरणी साधारणपणे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर होत असल्याने सध्या शिवार बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिनाभर थांबून थांबून पडलेल्या वादळी पावसामुळे यावर्षी आंतरमशागतीचे काम बऱ्यापैकी सोपे झाले असून रोहिणीसह मृगाचा पेरा साधण्यासाठी मशागतीची धांदल उडाली आहे.