कोल्हापूर : शिवाजी पार्कमध्ये विद्या भवनच्या पिछाडीस एका अपार्टमेंटची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली सहा वर्षांचा मुलगा अडकल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखून परिसरातील दक्ष नागरिकांनी तातडीने ढिगारा बाजूला केल्याने मुलाचे प्राण वाचले. त्याला तातडीने उपचारासाठी येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. निकुल प्रकाश साळवी (रा. शिवाजी पार्क) असे या जखमी बालकाचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी पार्क परिसरातील एका अपार्टमेंटच्या बाहेर सुमारे सहा फूट उंच असणारी संरक्षक भिंत पावसामुळे पूर्णपणे जीर्ण झाली होती. त्यावेळी त्या भिंतीलगत निकुल प्रकाश साळवी हा सहा वर्षांचा मुलगा खेळत होता. ही जीर्ण झालेली भिंत त्याच्या अंगावर कोसळली. सिमेंट काँक्रीटच्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तो अडकला गेला.
त्याचवेळी त्या रस्त्यावरून जाणारे नागरिक तानाजी मोरे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना जमा केले. यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. जमा झालेल्या नागरिकांनी तातडीने ढिगारा बाजूला करून त्याखाली अडकलेल्या मुलास बाहेर काढले. त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने अग्निशमन दलाच्या गाडीतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान, या निकुलचे वडील प्लंबिंग काम करीत असल्याने ते कामासाठी बाहेर होते, तर आई गृहिणी असल्याने त्यांना माहिती मिळताच त्या तातडीने घटनास्थळी आल्या. त्यांनी परिस्थिती पाहून आरडाओरडा केला. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती.
वेळीच मिळाली मदत म्हणून ‘निकुल’ वाचलाभिंत कोसळली त्यावेळी तानाजी मोरे हे त्या रस्त्यावरून जात होते. त्यांना त्या भिंतीखाली मुलगा अडकल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही क्षणांतच पडलेला ढिगारा उपसला व त्यासाठी गाडलेल्या निकुलची मुक्तता केली; त्यामुळे त्याचे प्राण वाचले.