गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी त्यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी सोमवारी गडहिंग्लज तालुक्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांनी पुतण्यासाठी केलेल्या ‘जुळणी दौऱ्या’ची गडहिंग्लजसह जिल्ह्यात विशेष चर्चा झाली. चार तासांच्या दौऱ्यात त्यांनी जनता दलाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, रेखाताई हत्तरकी, सदानंद हत्तरकी, भाजपचे नेते प्रकाशराव चव्हाण, माजी संचालक बी. टी. पाटील यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जि. प. सदस्य सतीश पाटील, माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी यांच्या घरी जाऊन त्यांनी लोकसभेसाठी धनंजय यांना मदत करण्याची विनंती केली.शिंदे यांनी लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत मंडलिक यांनाच मदत केली. गेल्यावेळी त्यांचे चिरंजीव संजय मंडलिक हे शिवसेनेकडून लढले होते. त्यावेळीही शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. त्यामुळे आप्पांनी अगदी ‘वेळेत’ येऊन त्यांना साकडे घातले आहे.स्वाती कोरी यांना ‘गोकुळ’ची उमेदवारी ?‘गोकुळ’चे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे हे पूर्वाश्रमीचे जनता दलाचे आजरा तालुकाध्यक्ष होत. त्यानंतर जनता दलाच्या वाटणीला आलेल्या ‘गोकुळ’च्या जागेवर ‘जद’चे जिल्हाध्यक्ष अॅड. अरुण सोनाळकर यांच्या पत्नी यांना संधी देण्यात आली होती. मात्र, येत्या निवडणुकीत जनता दलातर्फे अॅड. शिंदे यांची कन्या नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांना ‘गोकुळ’च्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या ‘उमेदवारीचा शब्द’ देऊन शिंदे यांची मदत मिळविण्याचा महाडिक यांचा प्रयत्न सुरू आहे.
जोडणीसाठी ‘आप्पा’ गडहिंग्लजमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:29 AM