कोल्हापूर : याचिकाकर्ते वंदना मगदूम व राजू मगदूम यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रामुळे बुधवारी १५ व्या वित्त आयोगाच्या सर्व याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवल्या. त्यामुळे मगदूम यांनी दिलगिरी व्यक्त करीत गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या निधी वाटप वादावर कायमचा पडदा टाकला. निधी वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून पदाधिकाऱ्यांनी न्यायालयीन वाद टाळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये असमान वाटप होत असल्याची तक्रार करीत माजी महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम व त्यांचे दीर माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जू्नपासून हा न्यायालयीन लढा सुरू होता. वित्त आयोगाचा १२ कोटींचा निधी अखर्चित राहील म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करीत निधी वाटप समान केले जाईल असे सांगून न्यायालयातील याचिका मागे घेण्याची अट घातली. त्यानुसार मगदूम यांनी याचिका मागे घेतल्या.