लोकमत आॅनलाईनकोल्हापूर, दि. ७ : चित्रकार आप्पासाहेब मेथे - पाटील यांच्या जलरंगातील निसर्ग चित्रांच्या रंग निसर्गाचे या प्रदर्शनाचे उदघाटन रविवारी जेष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात त्यांनी रेखाटलेल्या जलरंगातील ३१ कलाकृतींचा समावेश आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप जिल्हाधिकारी अशोक पाटील होते. या कार्यक्रमास चित्रकार संजय शेलार, चित्रकार विजय टिपुगडे, शाहीर आझाद नायकवडी, राजदीप सुर्वे, डॉ. संजय चव्हाण,प्रा. रविंद्र खांडेकर, अनुराधा मेथे - पाटील, कोडग सर, जे. आर. समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. आप्पासाहेब मेथे - पाटील यांनी रेखाटलेल्या या कलाकृतीमध्ये दरवेश पाडळी आणि गोवा येथील जुनी घरे, चर्च, आणि परिसरातील निसर्गाचा समावेश आहे. त्यांनी जलरंगात चित्र रेखाटताना स्टुडिओपेक्षा स्थळचित्रणालाच महत्त्व दिले आहे. क्षणाक्षणाला रूप बदलणारा निसर्ग रंगविताना वेगात काम करता येईल, असे माध्यम म्हणून जलरंगाचा वापर झाला. निसर्गाचे रंग, सावल्या, प्रकाश, विविध आकार रूप या प्रदर्शनात पाहावयास मिळतात.
चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण झाले नसतानाही प्रा. अजय दळवी, चित्रकार संजय शेलार, चित्रकार विजय टिपुगडे, बबन माने यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने या कलाकृती साकरल्याचे मेथे- पाटील यांनी मत व्यक्त केले. या प्रसंगी जेष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांनी या कलाकृतींचे कौतुक केले. निसर्गाची लोभसवाणी रूपं नेहमीच मनाला साद घालतात. आपल्या गावच्या जुन्या घराना चित्रबध्द करून मेथे-पाटील यांनी आपल्या गावाबद्दलच्या भावनाच जणू येथे मांडल्या आहेत, असेही गौरवद्गार त्यांनी काढले.
यावेळी चित्रकार संजय शेलार, शाहीर आझाद नायकवडी, उप जिल्हाधिकारी अशोक पाटील यांचीही भाषणे झाली. हे प्रदर्शन दिनांक ७ मे पासून १४ मे २०१७पर्र्यत राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनच्या कलादालनात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुले राहिल.