कोल्हापूर : कोल्हापूरच्याफुटबॉल क्षेत्रात तब्बल पाच दशके अनेक फुटबॉलपटू घडविण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असलेले व महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे माजी फुटबॉल प्रशिक्षक, आदर्श शिक्षक आप्पासाहेब गणपत वणिरे (वय ८६) यांचे रविवारी उशिरा रात्री निधन झाले. मराठी व भूगोल विषयांचे तज्ज्ञ शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.शिवाजी पेठेचा मानबिंदू व राजर्षी शाहूकालीन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या ते संचालकपदी कार्यरत होते. त्यांनी संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी काहीकाळ सांभाळली होती. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख होती. ते १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते; पण त्यांची शेवटपर्यंत संस्थेशी असलेली नाळ कायम होती.
वणिरे यांचा जन्म हा १२ डिसेंबर १९३४ मधील. एमएबीड पर्यंत शिक्षण घेतलेल्या वणिरे यांनी अध्यापनाबरोबरच खेळाकडेही विशेष लक्ष होते. वणिरे संस्थेचे माजी चेअरमन डी. बी. पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. माजी मुख्याध्यापक आर. डी. आतकिरे, आप्पासाहेब वणिरे व मधुकर सरनाईक यांची घनिष्ट मैत्री होती.
माजी मुख्याध्यापक आतकिरे व वणिरे हे दोघे उत्तम फुटबॉल प्रशिक्षक होते. कोल्हापुरातील अनेक फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी घडविलेले फुटबॉलपटू पोलीस दलासह महापालिका, महसूल, विद्यापीठ, सैन्यदलात नोकरीस लागले होते. विद्यार्थ्यांना चांगले वळण लागावे या तळमळीतून ते काम करीत. राज्याच्या कानाकोपऱ्यांत शालेय फुटबॉलमध्ये महाराष्ट्र हायस्कूल संघाचा दबदबा निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेने १९८० मध्ये त्यांना ह्यजिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारह्ण देऊन सन्मानित केले. राज्य सरकारचा १९९१ मध्ये ह्यआदर्श शिक्षक पुरस्कारह्ण मिळाला होता. कोल्हापूर महापालिकेने २००१ मध्ये ह्यकोल्हापूर भूषणह्ण पुरस्कारांनी गौरव केला होता. त्यांचे ह्यकवडसाह्ण या नावांनी आत्मकथनही प्रकाशित झाले आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या वाटचालीवर आधारित ह्यबहुजनपर्वह्णया ग्रंथाचे संपादन व लेखन आप्पासाहेब वणिरे यांनी केले होते.चार दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यातच तीन दिवसांपूर्वी रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सोमवारी सकाळी शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाशेजारील घरी कोल्हापूरच्या सामाजिक, क्रीडा, राजकीय, आदी क्षेत्रांतील दिग्गजांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत पार्थिवाचे दर्शन घेतले. मोजक्याच नातेवाईक, मित्रमंडळांच्या उपस्थितीत पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.