गारगोटी : गारगोटी येथे सोमवारी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी मंगळवारी गारगोटी येथे बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.
मेघोली तलाव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शिवसेना वगळता इतर पक्षांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाचे आयोजन मुगडे यांनी केले होते. पण, गेले चार दिवस सोशल मीडियावर आमदार आबिटकर यांच्या बदनामीच्या पोस्ट टाकल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. मोर्चा संपवून मुगडे चहा प्यायला गेले असता तेथे त्यांना मारहाण केली. याप्रकरणी परस्परविरोधी भुदरगड पोलिसात तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सोमवारपासून गारगोटी येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून संपूर्ण शहरात ताणतणाव पसरला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी मंगळवारी तातडीने बैठका घेऊन दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज आणि सामाजिक शांतता भंग होईल असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, राहुल देसाई यांच्या कार्यकर्त्यांची बैठक शाहू वाचनालयात झाली. या बैठकीला राष्ट्रवादी, भाजपचे नेते उपस्थित होते. तर आमदार आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आबिटकर यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला प्राचार्य अर्जुन आबिटकर आणि आबिटकर गटाचे नेते उपस्थित होते. दोन्हींकडील नेत्यांनी शांतता राखण्याचे अभिवचन दिले आहे.शहरात शांतता रहावी यासाठी कालपासून गारगोटी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारचा बंद मागे घेतला असल्याचे राहुल देसाई यांनी बैठकीत सांगितले.