लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : माणगाव येथे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिमाखदार पद्धतीने साजरी केली जाते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असल्याची माहिती बौद्ध समाजाचे अध्यक्ष अरुण शिंगे यांनी दिली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे माणगाव येथे माणगाव परिषदेच्या निमित्ताने पदार्पण झाले होते. या परिषदेमुळे डाॅ.आंबेडकर यांची सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. त्यामुळे या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. माणगाव परिषद स्थळापासून भीमज्योत नेण्याकरिता महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी येत असतात. प्रतिवर्षी याठिकाणी सातशे ते आठशे गावातील भीमयुवक हजारोंच्या संख्येने येथे येतात. भीमदीपज्योत ग्रामस्थ व बौद्ध समाजाच्या वतीने प्रज्वलित करण्यात येणार आहे पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमज्योत नेण्याकरिता कोणीही भीम अनुयायी परगावाहून येऊ नये असे आवाहन बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच व्याख्याने, कविसंमेलन,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या स्पर्धा दूरचलचित्राव्दारे घेण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, माजी अध्यक्ष नंदकुमार शिंगे,मुरलीधर कांबळे, सतीश माणगावकर,सुनील चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे,शिरीष मधाळे, नितीन गवळी यांनी दिली आहे.