कोल्हापूर- घरी बसायला लागतंय, लॉकडाऊन पाळायला लागतंय, भावा आता कोल्हापूर वाचवायला लागतंय, या रँप साँगच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. येथील युवा गायक आणि म्युझिक कंपोजर टिंकू खान याने हे गीत लिहिले आणि गायले आहे.जुलैमध्ये कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा लागू केला आहे. त्यापार्श्वभूमीवर टिंकू याने एकवेगळ्या प्रकारे कोल्हापूरकरांना आवाहन करण्यासाठी रँप साँगचा उपयोग केला आहे. त्याने अस्सल रांगड्या कोल्हापुरी भाषेत आवाहन करणारे गीत लिहून ते गायले आहे.
त्यांचे भाऊ शम्मी यांनी ते स्नेहबंध इव्हेंटच्या माध्यमातून सादर केले आहे. सोशल मिडियावर हे गीत व्हायरल झाले असून अनेकांचे फेसबुक पेज, व्हॉटस्अँप ग्रुपवर ते वाजत आहे. या गीताच्या व्हिडीओचे काम आदिल जमादार यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन कडकपणे पाळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही या रँप साँगची निर्मिती केली आहे. पहिल्यांदाच असा उपक्रम राबविला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.-शम्मी खान