कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मस्जिदीमधील नमाज पठण करण्यावर मर्यादा आल्या आहेत. अजान होण्याआधी जे मुस्लीम बांधव मस्जिदीमध्ये उपस्थित असतील त्यांनाच मस्जिदीमध्ये नमाजकरिता प्रवेश देण्यात येईल, अजान होताच दरवाजे बंद केले जातील, असे उलेमा समितीतर्फे सांगण्यात आले.
कोल्हापूर शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला असून खबरदारीचा उपाय म्हणून मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठण करावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
मुस्लीम बांधव दिवसभरात पाचवेळा नमाज पठण करत असतात. त्याकरिता मुस्लीम बांधवांची शहरातील विविध मस्जिदीमध्ये गर्दी होत असते. शुक्रवारी तर ही गर्दी मोठी असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यावर मर्यादा आल्या आहेत. अजान झाल्यानंतर जे आत असतील तेच लोक मस्जिदीत नमाज पठण करतील. त्यानंतर दरवाजे बंद केले जातील. जास्तीत जास्त लोकांनी घरीच नमाज पठण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.