कोल्हापूर : रंगपंचमीदिवशी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास शरिरास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे नैसर्गिक रंग आपण घरामध्ये सहज तयार करू शकतो. गेल्या अकरा वर्षांपासून आमच्या संस्थेच्यावतीने नैसर्गिक रंग वापरण्यासाठी आवाहन करत आहोत, त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले आणि डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकार परिषेदत दिली.चौगुले म्हणाले, निसर्गमित्रतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून वनस्पतीची पाने, फुले, फळांद्वारे रंग कसा तयार केला जातो याची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना देत आहोत. या नैसर्गिक रंगांतून सुगंधी वास तर येतोच पण त्याचसोबत हे शरीराला घातक नाहीत. निर्माल्यातील फुलांच्या पाकळ््यांचाही वापर करून आपण विविध रंग तयार करू शकतो. गतवर्षी आमच्या संस्थेच्यावतीने ९०० किलो रंग तयार केले होते. दरवर्षी याला मोठी मागणी होत आहे.
डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, ४१ प्रकारच्या वनस्पतींच्या पानांफुलापासून हे सात रंगामध्ये रंग तयार करण्यात आले आहेत. बाजारात इकोफ्रेंडली अशा रंगांची कोणतीही खात्री देता येत नसून वनस्पतीपासून बनवलेला रंग वापरणे आवश्यक आहे. या दृष्टीने ते तयार केले आहेत.यावेळी राणिता चौगुले यांनी नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच अधिक माहितीसाठी निसर्गमित्रद्वारा बापूसाहेब पाटील, ग्रंथालय, शाहूपुरी चौथी गल्ली, येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले.वनस्पतींची निवड -झेंडू, गुलाब, शेंद्री, पळस, काटेसावर, पांगरा, बेल, मंजिष्ठा, कुंकूफळ, पारिजातक, कडूलिंब, मेंहदी, निलमोहर, बहावा, बारतोंडी, हिरडा, बेडका, डाळींबसाल, धायटी, जांभूळ, सिताअशोक, पालक, पुदीना,बीट, टोमॅटो, गोकर्ण, शेवगा, गाजर, कडीपत्ता अशा वनस्पतींचा रंगनिर्मितीसाठी वापर केला असून त्यामुळे त्वचेला, डोळ््यांना कोणतीही इजा होत नाही. हे सर्व रंग पाण्यात विरघळणारे असून चेहरा रंगिवण्यासाठी सोपे आहेत.