राम मगदूम -- गडहिंग्लज --‘श्री गणपती देवा’च्या जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण -जोशी-दंडगे यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी त्यांच्याच नावाने व सहीने अर्ज करण्यात आला. त्यानुसार कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता तत्कालीन तहसीलदारांनी ‘देवा’च्या जमिनीचा ७/१२ स्वतंत्र करून त्यापैकी एका गट नंबरवरील ‘देवस्थान इनाम’ खालसा करून दिला. ‘मयता’च्या नावे फेरफारासाठी अर्ज करणारा इसम कोण ? त्याचा हेतू कोणता? त्याचा शोध ‘महसूल खाते’ घेत आहे.इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवाच्या जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी-दंडगे यांचा मृत्यू ८ सप्टेंबर २००५ ला झाला. त्यांच्या मृत्यूबरोबरच त्यांनी आपला भाऊ मनोहर बाळकृष्ण जोशी-दंडगे यांना ४६ वर्षांपूर्वी करून दिलेले वटमुखत्यारपत्र देखील रद्दबातल ठरते, असे असतानाही मूळ वहिवाटदाराच्या नावाने व सहीने ‘देवा’च्या जमिनीची खातेफोड करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला.२८ आॅगस्ट २००८ ला ‘गडहिंग्लज’च्या तत्कालीन तहसीलदारांकडे ७/१२ स्वतंत्र होऊन मिळण्यासाठी ग.बा. जोशी-दंडगे यांचे नावे व सहीने अर्ज करण्यात आला. ‘देवस्थान जमिनीची मालकी असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची परवानगी किंवा धर्मादाय आयुक्तांचा ‘अभिप्राय’ न घेताच तहसीलदारांनी देवस्थान जमिनीचे खाते स्वतंत्र करण्याचा ‘आदेश’ दिला आणि त्यांच्या ‘हुकूमा’ची अंमलबजावणी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी ‘तातडी’ने केली. यापाठीमागचे गौडबंगाल काय? याचीच चर्चा इंचनाळ पंचक्रोशीसह जिल्हाभर सुरू आहे.‘सात-बाऱ्या’त असा झाला ‘फेरफार’२७ नोव्हेंबर १९५९ : देवस्थान जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी यांनी आपला भाऊ मनोहर बाळकृष्ण जोशी यांना संंबंधित जमिनीसंदर्भात वटमुखत्यारपत्र करून दिले.८ सप्टेंबर २००५ : गजानन बाळकृृष्ण जोशी यांचा मृत्यू.२८ आॅगस्ट २००८ : ७/१२ स्वतंत्र होऊन मिळण्यासाठी गजानन बाळकृृष्ण जोशी-दंडगे यांच्या नावे व सहीने तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला.२४ आॅगस्ट २००८ : ७/१२ स्वतंत्र होऊन मिळण्यासाठी ‘२८ आॅगस्ट’ ला आलेला अर्ज तहसीलदारांनी ‘२४ आॅगस्ट’ला वाचला. तहसीलदारांच्या आदेशात ‘तारखे’चा हा घोळ दिसतो.१६ सप्टेंबर २००८ : देवस्थान जमिनीचे स्वतंत्र दोन गट नंबर व एका गट नंबरवरील ‘इनाम खालसा’ करण्याचे तत्कालीन तहसीलदारांचे बेकायदेशीर आदेश.३ आॅक्टोबर २००८ : तहसीलदारांच्या हुकुमानुसार देवस्थान जमिनीच्या ‘सात-बाऱ्या’वर फेरफाराची नोंद‘देवस्थान इनाम’ केला ‘देवस्थान खालसा’पूर्वी या जमिनीचा गट नंबर व हिस्सा क्रमांक २७३/१ आणि एकूण क्षेत्र दोन हेक्टर ६९ आर पोट खराब ०-१५ आर असे होते. फेरफारीनंतर २७३/१अ व २७३/१ ब असे दोन गट नंबर झाले. त्याचे क्षेत्र अनुक्रमे २७३/१अ क्षेत्र १ हेक्टर २९ आर. पोट खराब ०-०७ आर (देवस्थान खालसा), २७३/१ ब क्षेत्र १ हेक्टर ४० आर पोट खराब ०-०८ आर (देवस्थान इनाम) असे करण्यात आले.
‘मयता’च्या अर्जाने ‘सात-बाऱ्या’त फेरफार
By admin | Published: September 24, 2015 11:21 PM