कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाची तटबंदी कोसळून रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. संरक्षण तटबंदीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करून तत्काळ दुरुस्ती सुरू करा, असे आदेश आज, बुधवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले. रंकाळ्याची आयुक्तांनी आज बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसह पाहणी केली. चार महिन्यांपूर्वी रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या कोसळलेल्या तटबंदी दुरुस्तीचे काम बंद आहे. त्यातच महिन्यापूर्वी तटबंदीचा आणखी एक मोठा भाग कोसळला. तसेच ठोस उपाययोजना न राबविल्यास उद्यानाकडील तटबंदीचा मोठा भाग पाण्यात कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळा तलावास बसत असल्याची चर्चा शहरवासीयांत आहे. महापौर सुनीता राऊत यांनी रंकाळ्याच्या दुरुस्तीसाठी २८ लाख रुपयांची तरतूद करण्याची सूचना केली आहे. या अनुषंगाने आज आयुक्तांनी रंकाळ्याची पाहणी केली. रंकाळा उद्यान परिसरात शालिनी पॅलेससमोरील तलावाच्या आतील बाजूच्या तटबंदीमधील दोन दगडांना सांधून ठेवणार्या सिमेंटच्या दर्जा खराब झाल्या आहेत. यामुळेच तटबंदीचे दगड कोसळत आहेत. यावरती वेळीच उपाय न योजल्यास किमान तटबंदीची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. नारळाच्या झाडांच्या मुळांमुळे तटबंदीस धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे झाडे न तोडताही तटबंदी सुरक्षित करता येऊ शकते का? या विषयावर चर्चा सुरू झाली. मात्र, चर्चेपलीकडे महापालिकेत ठोस कारवाईसाठी काहीही झाले नाही. शालिनी पॅलेससमोरील संपूर्ण तटबंदीचे दगड निखळू लागल्याने तटबंदी वेडीवाकडी झाली आहे. तटबंदीचे दगड एकमेकांपासून सुटत असल्यामुळे, तसेच मागील जमीन भुसभुशीत झाल्याने कोणत्याही क्षणी ही तटबंदी कोसळू शकते.
रंकाळा तटबंदी दुरुस्तीचा ‘अॅक्शन प्लॅन’ तत्काळ राबवा
By admin | Published: June 05, 2014 1:21 AM