कळंबा : शहरातील ६२ प्रमुख झोपडपट्टीधारकांना पक्की घरे देण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करून प्रभावीपणे राबवा. ‘कोल्हापुरात कोणतेही नवीन काम करताना आंदोलन हे होणारच’, हे गृहीत धरूनच या कामाची आखणी करा, अशा सूचना बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेला दिल्या. महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या राज्य शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत तपोवन येथील विस्थापितांसाठी बांधलेल्या घरकुलांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अमल महाडिक होते.साळोखेनगर परिसरात रस्ते कामासाठी विस्थापित झालेल्या ६० झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळाली. २००६ मध्ये रस्ता रूंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या या झोपडपट्ट्या हटविण्यात आल्या होत्या. त्यानंतर राजकीय व परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे या झोपडपट्टी विस्थापितांना हक्काचे घरे मिळण्यास विलंब झाला. आठ वर्षांच्या संघर्षानंतर स्वघरात प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झोपडपट्टीधारकांच्या चेहऱ्यावर होता. नगरसेवक सुभाष रामुगडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. मंत्री पाटील यांच्या हस्ते संजय शामराव माने या अपंग दाम्पत्यास घराची चावी प्रदान करण्यात आली.आयुक्त पी. शिवशंकर शहरातील इतर झोपडपट्टीधारकांना पक्की घरे देण्याची योजना लवकरच हाती घेऊ, असे सांगून या घरकुलांसाठी लवकरच नळ योजना जोडण्याचे आदेश प्रशासनास दिले. झोपडपट्टीधारकांनी आंदोलनास दिलेल्या साथीमुळेच घरकुल योजना पूर्ण झाली, घरकुल प्रदान करताना विशेष आनंद होत असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे,राहुल काळे, रमेश चावरे आदींसह नागरिक व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दादांचा सल्ला..!मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना ‘क ठीण काम में ही मजा हैं’ विरोध गृहीत धरूनच कोल्हापुरातील आंदोलकांना तोंड देतच झोपडपट्टी सुधार कार्यक्रम राबवावा, असे सांगितले तर झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या घरकुलास विरोध करणाऱ्यांना परिसरासह घरांची स्वच्छता व नेटकेपणा ठेवून ते चुकीचे होते हे दाखवून द्या, असा सल्ला दिला.
झोपडपट्ट्यांसाठी कृती कार्यक्रम राबवा
By admin | Published: May 15, 2015 11:47 PM