कोल्हापूर : जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ‘हमारी युनियन... हमारी ताकद...’अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांत देशव्यापी ‘मागणी दिन’ पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे दुपारी जेवणाच्या सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी एकवटले. या ठिकाणी ‘जोर से बोल हल्लाबोल...’,‘बात तो तुमको करनी होगी... न्याय तो तुमको देना होगा...’, ‘नहीं देंगे तो लड के लेंगे...’ अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली.यानंतर संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.आंदोलनात जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, संजय क्षीरसागर, अकिल शेख, संदीप पाटील, अजय नाईक, राहुल कोळी, उदय लांबोरे, सिकंदर नदाफ, मच्छिंद्र कुंभार, बी. एस. खोत, सतीश ढेकळे, संजीवनी दळवी, उत्तम पाटील, अनिल खोत, शांताराम पाटील, महेश सावंत, आदी सहभागी झाले होते.