कोल्हापूर : शहरातील विविध ३५ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यावर्षी केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा प्रारंभ दि. २५ ऑगस्ट (बुधवार) पासून होणार आहे. त्या दिवसापासून ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीने या प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जाहीर केले. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा प्रवेशाच्या दोन फेऱ्या होणार आहेत.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (www.dydekop.org) या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत. अर्ज भरण्याची सुविधा सुरू होण्यापूर्वी दि. २४ ऑगस्ट रोजी प्रवेशाबाबतची माहितीपुस्तिका आणि अन्य माहिती विद्यार्थी, पालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासह हेल्पलाईन सुरू केली जाईल. प्रवेशाची पहिली फेरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. शासनाच्या आदेशानंतर अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्रवेश समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली. दरम्यान, वेळापत्रक निश्चितीपूर्वी महाराष्ट्र हायस्कूल येथे दुपारी बारा ते दोन यावेळेत प्रवेश समितीची शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये उपस्थित प्राचार्यांसमवेत चर्चा करून वेळापत्रक तयार करण्यात आले. यावेळी प्राचार्य ए. एस. रामाणे, व्ही. ए. पाटील. व्ही. एम. पाटील, आर. के. शानेदिवाण, आर. पी. लोखंडे, संजय फराकटे, पी. एस. जाधव, प्रशांत नागांवकर, ए. बी. पाटील आदी उपस्थित होते.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
दि. २५ ते ३० ऑगस्ट : ऑनलाईन अर्ज भरणे
दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर : अर्जांची छाननी
दि. ३ ते ६ सप्टेंबर : निवड यादी तयार करणे
दि. ७ सप्टेंबर : निवड यादीची प्रसिद्धी
दि. ७ ते ८ सप्टेंबर : तक्रार निवारणाची प्रक्रिया
दि. ८ ते १५ सप्टेंबर : प्रवेश निश्चित करणे
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, शुल्क
१) शाळा सोडल्याचा दाखला
२) दहावीची गुणपत्रिका
३)आरक्षण प्रवर्गातून अर्ज भरल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
४) दाखला वेळेत मिळाला नसल्यास बंधपत्र
५) ११० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार
शहरातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये : ३५
एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
विज्ञान : ६०००
कला (इंग्रजी) :१२०
कला (मराठी) : ३६००
वाणिज्य (इंग्रजी) : १६००
वाणिज्य (मराठी) : ३३६०
गेल्यावर्षी अशी होती स्थिती
अर्ज केलेले एकूण विद्यार्थी : १२६९१
दोन्ही फेऱ्यांमधील एकूण प्रवेशित विद्यार्थी : ६८७३
रिक्त राहिलेल्या जागा : ७८०७