कोल्हापूर : राज्यातील बिगर नेट-सेट अध्यापकांना पेन्शन लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने (मस्ट) केली. त्याबाबतचे निवेदन या शिष्टमंडळाने आमदार जयंत आसगावकर यांना दिले.
दि. २४ ऑक्टोबर १९९२ ते दि. १८ ऑक्टोबर २००१ च्या कालावधीत नेमलेले अध्यापक हे बिगर नेट-सेट असल्यामुळे त्यांना शासनाने पेन्शन मंजूर केलेली नव्हती. सध्या त्यातील अनेक अध्यापकांचा मृत्यू झाला आहे. काही सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही त्या मार्गावर आहेत. त्यातील काही अध्यापकांनी पेन्शनसाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत पेन्शन देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, राज्य शासनाने अद्याप त्याप्रमाणे आदेश काढलेला नाही. या अधिवेशनात पेन्शन मंजूर करून घेण्याबाबतचा ठराव करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या शिष्टमंडळात प्रा. पी. आर. फराकटे, सुरेश दिवाण, विक्रांत बांदिवडेकर, गणेश देशपांडे आदींचा समावेश आहे.