कोल्हापूर: थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर आरआरसींतर्गत, तर २३ कारखान्यांना उस नियंत्रण आदेशांतर्गत कारवाईच्या अधिकृत नोटिसा गुरुवारी लागू झाल्या.
आरआरसीची कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगलीतील पाच कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची शुक्रवारी पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर सुनावणी होत आहे. यात साखर जप्तीसह १५ टक्के व्याजासह एफआरपी देण्याबाबत पुढील कारवाईवर चर्चा होणार आहे.चालू गळीत हंगामाची वाटचाल सांगतेकडे सुरू झाली तरी अजूनही तुटलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. एकरकमी एफआरपी देता येत नसल्याचे सांगत काही कारखान्यांनी ८0:२0 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिली उचल म्हणून प्रतिटन २३00 रुपयांपर्यंतची उचल देऊ केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी नोव्हेबरअखेरपर्यंतची बिले दिली आहेत.
डिसेंबरपासूनची सर्व बिले थकीत ठेवली आहेत. उस नियंत्रण आदेश १९६६ नुसार उस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत बिल जमा न केल्यास १५ टक्के व्याजासह एफआरपी देणे बंधनकारक आहे, असे न केल्यास त्यांच्यावर आरआरसीअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत साखर जप्तीची कारवाई होते.त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. कारवाईच्या या फेऱ्यात कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील ३५ कारखाने अडकले आहेत. यातही एकही रुपया आतापर्यंत अदा न केलेल्या १२, तर २३00 प्रमाणे जमा केलेल्या २३ कारखान्यांचा समावेश आहे. १२ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई आठ दिवसांत सुरू होत आहे, तर २३00 रुपये जमा केलेल्या कारखान्यांनी उर्वरित रक्कम व्याजासह तातडीने देण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
आरआरसी लागू झालेले कारखानेकोल्हापूर : दत्त शिरोळ, जवाहर हुपरी, वारणा, पंचगंगा, इको केन, संताजी घोरपडे, गुरुदत्त शुगर्स.सांगली : केन अॅग्रो, विश्वास, निनाई दालमिया, वसंतदादा, महाकाली.१९६६ मधील कलम ३(३) अन्वये लागू झालेल्या नोटिसाकोल्हापूर : आजरा, नलवडे गडहिंग्लज, भोगावती, राजाराम, शाहू कागल, डी. वाय. पाटील, बिद्री, कुंभी-कासारी, मंडलिक हमीदवाडा, उदयसिंग गायकवाड, अथणी शुगर्स.सांगली : उदगिरी शुगर्स, सोनहिरा, सद्गुरूशुगर्स, सर्वोदय, राजारामबापू वाटेगाव व साखराळे, मोहनराव शिंदे, ओलम शुगर्स, रिलायबल शुगर्स, क्रांती अग्रणी, हुतात्मा.