परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यात पूर्व नियोजनानुसार नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची आज, बुधवारपर्यंत अंतिम मुदत होती. त्यानंतर विलंब आणि अतिविलंब शुल्काची मुदत विद्यापीठाने जाहीर केली होती. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने विलंब, अतिविलंब शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाकडून ५० विलंब शुल्क, तर ३५० रुपये अतिविलंब शुल्क आकारण्यात येते. पण, या निर्णयामुळे यावर्षी ते आकारले जाणार नाही. आता विद्यार्थ्यांनी महाविद्यालय अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये परीक्षा अर्ज भरण्याची तारीख २६ जुलै, तर महाविद्यालयांनी विद्यापीठामध्ये परीक्षा अर्जाच्या याद्या सादर करण्याची तारीख २८ जुलै आहे. या निर्णयाची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाने संलग्नित अधिविभाग आणि महाविद्यालयांना दिली आहे. दरम्यान, यापूर्वी विद्यापीठाने कोरोनाच्या स्थितीमुळे सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांची परीक्षा शुल्कवाढ स्थगित केली आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाची स्थितीचा विचार करून विद्यापीठाने परीक्षा अर्जाच्या विलंब, अतिविलंब शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू.