इंद्रजित देशमुखआर्जवाच्या बाबतीत माऊली ज्ञानोबारायांची एक खूप देखणी ओवी आहे,जे अखंड अगर्वता होवूनी असती ।जयांची विनय हेचि संपत्ती ।आणि जय जय मंत्रे अर्पिती ।माझ्याचि ठायी ।।सामान्यपणे समाजात वावरत असताना आम्ही आमच्याकडे भांडवल ठेवलेलं असतं ते म्हणजे मोठेपणाचं. कधी सत्तेतील मोठेपणा, कधी संपत्तीतील मोठेपणा, कधी पदाचा मोठेपणा, तर कधी प्रतिष्ठेचा मोठेपणा. या मोठेपणाला संपत्ती समजून आम्ही जगाशी व्यवहार करत असतो. त्याचमुळे बऱ्याचदा या मोठेपणाच्या अहंपणामुळे वाद उद्भवत असतात, पण खºया अर्थानं ज्यांनी स्वत:च्या ठिकाणी आर्जव किंवा सौजन्य धारण केलेले असतं, त्यांची संपत्ती एकच असते ती म्हणजे विनय.या विनयाला उराशी धरून क्रमित होत असलेलं त्यांचं जगणं अखंड अगर्वतेने भरलेलं असतं आणि त्याचमुळे ते निकोप जगत असतात. अंतरी धरलेले विनय-वैभव कधीच ढासळत अथवा ढळत नाही. त्यामुळे समोरुन कोणताही चुकीचा आघात आला तरी ते आपला विनयशील स्वभाव सोडत नाहीत. आमच्या पैठणच्या एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग घडले गेले त्या प्रसंगांमध्ये एक प्रसंग खूप देखणा आहे. कुणीतरी व्यक्ती एकनाथ महाराजांना राग यावा म्हणून नाथ महाराजांच्या देवघरात पायातील वाहणांसह गेला. वास्तविक या कृतीमुळे एकनाथ महाराजांना राग येईल असं काही लोकांना अपेक्षित होतं, पण अगदी पैज लावून राग आणायचा प्रयत्न केला. तरीही राग येऊ न देणारे आमचे नाथराय अविचल राहिले. त्यांनी पायातील वाहणांसह आलेल्या त्या व्यक्तीचं स्वागतच केलं. शेवटी त्या व्यक्तीलाही खजिल झाल्यासारखं वाटलं. ज्यांनी अंतरी या प्रकारचं निग्रही सौजन्य धारण केलेलं असतं, ते समोरुन आलेल्या आणि हे सौजन्य मोडू पाहणाºया कोणत्याही आपत्तीला आपत्ती न समजता, इष्ट आपत्ती समजून आपले सौजन्याधिष्ठित जीवनव्यवहार अबाधित ठेवत असतात. अंत:करणात सौजन्याचं भरतं असणारे महात्मे जगावर सौजन्याचा वर्षावच करतात.हे विश्वची माझे घर,ऐसी मती जयाची स्थिरकिंबहुना चराचर । आपणची जाहला ।।या वृत्तीने जगाशी व्यवहार ठेवत असणारे हे महात्मे आपल्या चित्ताचं समत्व आणि ते सौजन्याने शृंगारलेले समत्व या जगामध्ये बहरवत असतात. कृतज्ञतेने भरलेली त्यांची नजर कशाचाच धिक्कार करायला तयार नसते. झाडे, वेली, पशु-पक्षी, हवा, पाणी, पाऊस, वारा या निसर्गाच्या सर्व रूपात सतत वंदन करत त्याचं जगणं क्रमित होत असतं. विशेषत्वाने आपल्या संस्कृतीमध्ये जे सण आहेत, ते सण या चराचरातील सर्व गोष्टींच्याबद्दल आर्जवच व्यक्त करणारे आहेत. आजच आपल्याकडे नागोबांची पूजा केली जाणारा नागपंचमी नावाचा सण साजरा होत आहे. वास्तविक नाग हा विषारी प्राणी आहे, पण नैसर्गिक अन्नसाखळीचा विचार करता ह्या अन्नसाखळीच्या संतुलनीय आयोजनासाठी नागाचं असणं आमच्यासाठी उपकारकारच आहे. म्हणूनच आपण त्याची पूजा करतो. आपल्याकडील प्रत्येक सणात अशी कोणाला कोणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. हे करण्यापाठीमागे आमच्या पूर्वजांचा उद्देश हाच आहे की, आमच्यातील आर्जव वाढीस लागावा आणि वृद्धिंगत व्हावा.आपण आर्जवाचा इतका विचार केल्यानंतर आमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की, सतत आर्जवानं राहणं म्हणजे कायम नमतं घेणं किंवा लाचार राहणं म्हणजे आर्जव का; तर तसं अजिबात नाही. आर्जवामध्ये आईची हाकही असते आणि बापाचा धाकही असतो. शाळेमध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना घडवत असताना प्रेमाच्या हाकेनं शिकवत असतातच, पण गरज पडली तर पाठीवर हात फिरविण्याऐवजी एखादा धबुका पाठीवर घालून शिकवत असतात. चिखलाची मडकी तयार करणारा कुंभार हाताच्या नाजूकपणाने जसा त्या मडक्याला आकार देतो, तसा बºयाच वेळेला आपल्या हातातील थापाट्याने त्या चिखलाला थापटून आकारही देत असतो. चिखलाला सुबक आकारामध्ये रूपांतरित होण्यासाठी त्या कुंभाराकडे नाजूक हाताळणीबरोबर थापाटण्याचा मारही आवश्यक असतो. जगातलं माणसामाणसांतलं चांगुलपणाचं आंतरक्रियात्मक नातं अबाधित राहण्यासाठी सौजन्य हा गुण आमच्याकडे असलाच पाहिजे. सौजन्याच्या जोरावरच पाषाणाला पान्हा फोडून चांगल्याकडून चांगलं आणि वाईटांकडूनही चांगलं म्हणजेच हित करणाऱ्यांकडूनही हितच आणि अहित करणाºयांकडूनही हितच करून घेण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौजन्याच्या जोरावर हाती घेतलेल्या सगळ्या मोहिमा निकोपपणाने आणि विशेष म्हणजे आपल्या अस्तित्वाने इतरांच्या अस्तित्वाला बाधा न आणता पार पडत असतात. वारकरी सांप्रदायातील संतांनी जीवित आचरणासाठी ज्या ज्या मार्गांचा ऊहापोह केलेला आहे, त्या सर्व मार्गांचा विचार करता आर्जवीय मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. तो आम्ही मनापासून अवलंबवावा एवढीच अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)
आर्जव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:29 PM