कोल्हापूर : खासगी रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्ण व नातेवाईकांची लूट केली जात आहे, तरी येथील बिल तपासणीसाठी ग्रामीण भागात तालुका व शहरात वॉर्डनिहाय भरारी पथक स्थापन करावे, खासगी रुग्णालयातील बिलांचे १५ दिवसांनी ऑडिट करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ग्रामीण भागात दहा तालुक्यांत पंचायत समिती येथे खासगी रुग्णालयातील बिलांच्या तक्रारीसंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा व तेथील हेल्पलाईन क्रमांक जाहीर करावा, शहरात अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून वॉर्डनिहाय कोविड १९ तक्रार निवारण केंद्र सुरू करावे. जादा बिलासंदर्भात रुग्णांना तक्रार करायची असल्यास सर्व खासगी रुग्णालयात त्याबाबतचे फलक व हेल्पलाईन नंबर दर्शनी भागात लावण्यात यावेत. असे झाल्यास नागरिकांची सोय होईल, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे या रुग्णालयांमध्ये उपचार केले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
--