कोल्हापूर : महानगरपालिका स्थायी समितीवर असलेल्या रिक्त जागांवर नऊ सदस्यांची सर्वसाधारण सभेत वर्णी लागली. त्यामध्ये शारंगधर देशमुख यांना पुन्हा संधी मिळाली आहे; त्यामुळे सभापतिपदासाठी ते पुन्हा दावेदार असण्याची शक्यता आहे. तसेच परिवहन समितीवर सदस्यपदाच्या रिक्त नऊही जागा भरण्यात आल्या.महापालिकेच्या स्थायी समितीवर रिक्त झालेल्या नऊ जागांवर सदस्यपदासाठी वर्णी लागण्यासाठी सर्वच आघाडीत मोठी स्पर्धाच सुरू होती; त्यामुळे या समितीवर कोणाची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता होती.
गेल्या वर्षी भाजप-ताराराणी आघाडीने गुपचूपपणे हालचाली करत राष्ट्रवादीचे दोन सदस्य फोडून भाजपच्या आशिष ढवळे यांची सभापतिपदी वर्णी लागली. गेल्यावर्षी ज्या पद्धतीने हालचाली झाल्या, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा धोका पोहोचू नये, यासाठी काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.यंदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेसकडे सभापतिपद आहे. यामुळे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसतर्फे गटनेते शारंगधर देशमुख, माधुरी लाड, छाया पोवार, प्रवीण केसरकर यांची वर्णी लागली. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला संख्याबळानुसार दोनच जागा आल्याने त्या ठिकाणी संदीप कवाळे व माधवी गवंडी यांची नियुक्ती झाली. याशिवाय ताराराणी तर्फे पूजा नाईकनवरे आणि राजाराम गायकवाड, तर भाजपतर्फे सविता भालकर यांची वर्णी लागली.प्रताप जाधव, राहुल माने नाराजकाँग्रेसतर्फे राहुल माने आणि प्रताप जाधव हे दोन्हीही नगरसेवक स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुक होते. त्यापैकी माने यांनी सभापती पदासाठी दावाही केला होता; पण त्यांची वर्णी न लागल्याने ते नाराज झाले. त्यापैकी प्रताप जाधव यांचे नाव न आल्याने ते सभागृहाकडेच फिरकले नाहीत.