समीर देशपांडेकोल्हापूर : शालेय शिक्षण विभागाने सेवानिवृत्त शिक्षकांना एक वर्षासाठी करार तत्त्वावर पुन्हा अध्यापनासाठी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला अनुसरून कोल्हापूर जिल्ह्यात २७४ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे.जिल्ह्यात १३८९ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयानुसार गेल्या महिन्यात निवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण होऊन जिल्ह्यात २७४ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या शिक्षकांना मासिक २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ही नियुक्ती वर्षभरासाठी असून, मे महिन्यात त्यांची सेवा खंडित करून गरज पडल्यास पुन्हा जून २०२४ पासून त्यांना पुढे घेण्यात येईल. इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असताना या आवाहनाला निवृत्त शिक्षकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. अनेक शिक्षक हे तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे पुन्हा दुर्गम भागात नोकरीसाठी जाण्यास तयार नाहीत.
तालुकावर नियुक्त केलेले सेवानिवृत्त शिक्षककरवीर - ५७शिरोळ - ३४हातकणंगले - ३४पन्हाळा - ३१कागल - २४राधानगरी - २२भुदरगड - २०गडहिंग्लज - १४चंदगड - १४आजरा - ११शाहूवाडी - १०गगनबावडा - ०२एकूण - २७४
कणेरी मठाकडून १०० स्वयंसेवक शिक्षकयेथून जवळच असलेल्या काडसिद्धेश्वर स्वामीच्या कणेरी मठाकडून १०० शाळांना स्वयंसेवक शिक्षक पुरवण्यात येणार आहेत. मठाने ‘विद्याचेतना’ नावाचा उपक्रम सुरू केला असून, जिल्हा परिषदेशी झालेल्या करारानुसार गरज असलेल्या ठिकाणी या १०० शिक्षकांची मठाच्या वतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, जिल्हा परिषद सुचवेल त्या शाळांमध्ये हे स्वयंसेवक शिक्षक अध्यापन करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले.