कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहण्यास बजावले आहे, तर दिवसभरात १५० जणांनाच वाहन चालविण्याची परवाना परीक्षा व चाचणीसाठी वेळ व तारीख निश्चिती (अपाॅइंटमेंट) दिली जात आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांचे सोशल डिस्टन्स, मास्क सक्ती, सॅनिटायझर या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, तर वाहन चालविण्याचा कच्चा (लर्निंग) व एमएडीएल पक्का वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी परीक्षा व चाचणी यासाठी दिवसभरात २०० जणांची चाचणी घेतली जात होती. त्यात बदल करून आता केवळ १५० जणांना त्याकरिता वेळ निश्चिती व तारीख (अपाॅइंटमेट) दिली जात आहे. त्यामुळे दोन्हींकरिता प्रत्येकी ५० जणांचा कोटा रद्द करण्यात आला आहे. त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे. केवळ अपाॅइंटमेंट असलेल्यांनाच कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टिव्हन अल्वारीस यांनी दिली.