कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी-सेवेकरी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी वैदिक ज्ञान आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी १२ तारखेपर्यंत आपले अर्ज समितीकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.पगारी पुजारी कायदा संमत झाल्यानंतर दहा महिन्यांनी देवस्थान समितीने शनिवारी (दि. २) शासनाच्या निर्देशानुसार पगारी पुजारी-सेवेकरी भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी १२ तारखेपर्यंत अर्ज सादर करणे गरजेचे आहे. प्राप्त अर्जदारांच्या मुलाखती १५ ते २२ तारखेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांनी यापूर्वी १९ ते २१ जून या काळात मुलाखती दिल्या आहेत, त्यांनाही नव्याने अर्ज सादर करावे लागणार आहेत.पुजारी-सेवेकरी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांचे वय १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे असून वैदिक अनुभव असणाºया उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जावर उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहे. अर्ज पोस्टाने, कुरियरने किंवा समक्ष स्वीकारले जातील.
मुलाखतीची वेळ व ठिकाण उमेदवारांना वैयक्तिकरीत्या कळविली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज अपात्र ठरवले जातील. तरी इच्छुकांनी आपले अर्ज १२ तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत समितीच्या २४०२, ए वॉर्ड, अपना बँक बिल्डिंग, उभा मारुती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर या पत्त्यावर पाठवावेत अथवा समक्ष आणून द्यावेत, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.