कोल्हापूर : येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील सुनावणीसाठी सरकारी वकिलांना मदत होण्याकरिता साहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांची पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी नियुक्ती केली. त्यानुसार त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांनी या प्रकरणाचा तपास केला असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली.अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर सुरू आहे. हा खटला परिस्थितिजन्य व तांत्रिक पुराव्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे खटल्यात वकिलांना मदत होण्यासाठी या प्रकरणाचा तपास केलेल्या संगीता अल्फान्सो यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली.तत्कालीन तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी कसून तपास केला. यात व्हिडीओ रेकॉर्डिंग, क्लिप व मोबाईलवरील संभाषण व इतर तांत्रिक माहिती पुरावे म्हणून जमा केली आहे. मृतदेह व हत्यार अद्यापही सापडलेले नाही. त्यामुळे हा गुन्हा तांत्रिक पुराव्यांवर अवलंबून आहे. त्यामध्ये अल्फान्सो यांची चांगल्या प्रकारे मदत होईल व आरोपींविरुद्ध न्यायालयात भक्कम पुरावा मांडण्यासही मोठी मदत होईल.
त्यामुळे खटल्याच्या कामकाजावेळी संगीता अल्फान्सो यांना न्यायालयात हजर राहण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती विशेष सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी अल्फान्सो यांची नियुक्ती केली.अडीच तास सुनावणी; पुढील सुनावणी १० जानेवारीलागुरुवारी झालेल्या कामकाजावेळी साक्षीदार व फिर्यादी आनंद बिद्रे यांची आरोपीच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली. यावेळी खटल्याबद्दल काही गोपनीय बाबी तुमच्यापर्यंत कोणी पोहोचविल्या याची त्यांनी विचारपूस केली. तेव्हा आनंद बिद्रे यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवून घेतल्याचे सांगितले. अडीच तास ही सुनावणी चालली. यावेळी संशयित आरोपी अभय कुरुंदकरसह इतर आरोपी न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी १० जानेवारी २०२० रोजी होणार आहे.