कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनियंत्रणा रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पथक नियुक्त केले आहे. ध्वनियंत्रणा दिसताच ती जाग्यावर जप्त करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत.
या पथकाने शहरातील काही मंडळे, तालमीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ध्वनिमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मनधरणी केली. तसेच कलम १४९ प्रमाणे नोटिसा दिल्या असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.कोल्हापूरच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. पोलीस प्रशासनाने ध्वनीविरहित गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी निवडक पोलिसांचे विशेष पथक नियुक्त केले आहे.
या पथकाने शहरातील ध्वनियंत्रणेचा आग्रह धरणारी काही मंडळे, तालमींच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मनधरणी केली. तसेच त्यांच्या हाती कलम १४९ (प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा) म्हणून नोटीस बजावली.
महापुरामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बहुतांश तरुण मंडळे, तालीम संस्थांनी घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिसांवरील ताण थोडाफार कमी झाला असला तरी सतर्क राहण्यासाठी आतापासूनच सार्वजनिक मंडळांचे प्रबोधन केले जात आहे.