सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी. याकरिता राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे क्रीडा मार्गदर्शक नेमले जातात. मात्र, गेल्या वर्षभरापासून राज्यातील १५३ क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यात मुदतवाढही दिलेली नाही अथवा रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.राज्यातील उदयोन्मुख क्रीडापटूंमधून पदक विजेते खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर एकूण १५३ क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणीनिहाय पदे दि. १५ जुलै २०१०च्या शासननिर्णयान्वये मानधन तत्त्वावर निर्माण करण्यात आली. त्यातत्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.सन २०२० च्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पदक विजेते खेळाडू घडविण्यासाठी व शासनाच्या क्रीडा संकुलात विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी १५३ क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करावी, असा निर्णय झाला.त्यात दि. २१ ते २५ फेबु्रवारी २०१२ दरम्यान मुलाखती घेऊन क्रीडा मार्गदर्शकांची मानधनावर नियुक्ती केली. ही नियुक्ती दि. १८ जून २०१२ ते दि. १७ जून २०१३ अशी करण्यात आली. कामगिरीचे मूल्यांकन करून पुनर्नियुक्ती करण्याचे ठरविले, पण तसे घडलेच नाही. त्यानंतर नियुक्तीत सातत्यच राहिले नाही.नियुक्त्याच नाहीत, तर कामगिरी कशी सुधारेल१ आॅगस्ट २०१३ ला नियुक्ताच संपुष्टात आणण्यात आल्या. त्यानंतर ८ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा दि. १३ मार्च २०१४ ते ३१ मे २०१४ या अडीच महिन्यांच्या कालावधीसाठी क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ३१ मे २०१४ ला पुन्हा सेवा संपुष्टात आणण्यात आली. पुन्हा याच मार्गदर्शकांना १५ मार्च २०१५ ते ३० जून २०१५ या कालावधीत नियुक्ती देण्यात आली. १० फेबु्रवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आजअखेर या १५३ जणांना क्रीडा खात्याने लटकत ठेवले असून, अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा नियुक्त्या रखडल्यानंतर राज्यातील खेळाडूंची कामगिरी तरी कशी सुधारेल, असा सवाल क्रीडाप्रेमींतूनही व्यक्त होत आहे.शासनाने ३ आॅक्टोबर २०१७ ला एका आदेशान्वये मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. मात्र, क्रीडा खात्याने आजअखेर त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे राज्यातील १५३ जणांचे भवितव्य लटकले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मार्गदर्शकांवर अन्याय होत आहे.- कृष्णात पाटील,कुस्ती प्रशिक्षक
क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:32 AM