जोतिबा डोंगरावरील तीन मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा कौतुक सोहळा श्री स्वामी विवेकानंद ग्रंथालय व एकात्मता तरुण मंडळ यांच्या संयुक्तपणे साजरा केला. यामध्ये डॉ. नयन अशोक धडेल (बी.एम.एस.) पदवी घेऊन गावातील पुजारी समाजाची पहिली महिला डॉक्टर बनली. कु. शीतल मच्छिंद्र डवरी् (बी.ए., बी.एड.) शिक्षणशास्त्र पदवी विद्यापीठात सहावी आली. तृषा जालंदर सातार्डेकर- राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक व राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली. अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यशस्वी ठरलेल्या गावातील सुकन्यांचा सत्कार जोतिबा डोंगरचे सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रामपंचायत सदस्य लखन लादे, हिंदू एकता आंदोलनचे अध्यक्ष कृष्णात बुणे, ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय सांगळे, एकात्मता मंडळाचे अध्यक्ष भानुदास ठाकरे, सचिव सज्जन सातार्डेकर, खजानीस भारत दादर्णे, संचालक मच्छिंद्र डवरी, आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष अशोक धडेल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंडळाचे सहसचिव नवनाथ मिटके यांनी आभार मानले.
फोटो कॅप्सन :- १) जोतिबा डोंगर येथील यशस्वी मुलींचा सत्कार करताना सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगळे, स्वामी विवेकानंद ग्रंथालय व एकात्मता तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.