कोल्हापूर : ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीत आईच्या शरीराचे तुकडे करून तिचा निर्दयीपणे खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या दुर्मिळातील दुर्मीळ घटनेचा तपास शास्त्रीय पद्धतीने केल्याबद्दल शाहुपुरी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे, त्यांचे पथक व पैरवी अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले. तसेच त्याबद्दल त्यांना १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
कौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक, हे. कॉं. सुरेश परीट, लक्ष्मण लोहार, तानाजी चौगुले, सागर माळवी यांच्या पथकाने केला. घटनेचा शास्त्रीय पद्धतीने तपास करून तो न्यायालयात सिद्ध करता आला, त्याबद्दल त्या मोरे यांच्यासह तपास अधिकारी व पैरवी अधिकारी यांचे अधीक्षक बलकवडे यांनी कौतुक केले. त्याशिवाय न्यायालयातही जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-४) महेश जाधव यांनी, तपास अधिकारी पो. नि. संजय मोरे, सरकारी अभियोक्ता ॲड. विवेक शुक्ल यांनीही चांगला तपास केल्याचे न्यायालयात नमूद केले.
खटल्याचा घटना क्रम :
- २८ ऑगस्ट २०१७- दुपारी खुनाची घटना, सायं. ६ वा. आरोपी अटक
- २९ ऑगस्ट - आरोपी न्यायालयात हजर, तीन दिवस पोलीस कोठडी
- २१ नोव्हेंबर- न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
- ३० डिसेंबर - आरोपीवर दोष निश्चिती
- २६ ऑगस्ट २०१९- खटल्याची सुनावणी सुरू
- ०२ जुलै २०२१ - आरोपीला दोषी ठरवले
- ०६ जुुलै - सरकारी वकिलांकडून फाशीच्या शिक्षेची मागणी
- ०८ जुलै -न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली