लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील विविध जागांवरील आरक्षणासंदर्भातील एकूण ५२ विषयांवर फक्त १५ मिनिटे खडाजंगी स्वरूपाची चर्चा करून विषयाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
वार्षिक अंदाजपत्रकासह विविध ८३ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी ऑफलाइन सभा झाली. सुरुवातीला ऐनवेळचे पाच विषय घेण्यावरून वाद सुरू झाला. आर्थिक विषयाशी निगडित असल्याने ते विषय रद्द करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक मदन कारंडे यांनी, शहराची वाढलेली लोकसंख्या व औद्योगिकीकरण याचा विचार करून नगरपालिकेची महापालिका करण्याचा ठराव करावा, अशी लक्षवेधी मांडली. त्यामध्ये नगरपालिकेची स्थापना सन १८९३ साली झाली आहे. त्यामुळे स्थापना होऊन १२५ वर्षे उलटली आहेत. नगरपालिकेचा पसारा वाढला असून, महापालिकेचा दर्जा मिळाल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल, अधिकार वाढतील. परिसरातील आवश्यक भागांचा समावेश करून घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर चर्चा होऊन प्रशासनाने महापालिकेसाठी आवश्यक निकष पाहून त्याचा प्रस्ताव तयार करून तो सभागृहासमोर ठेवावा, असा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर शहरातील विविध ठिकाणची आरक्षणे बदलणे, फेरफार, रद्द करणे, अशा विविध कारणांसाठी सभेसमोर आणलेल्या एकूण ५२ विषयांना १५ मिनिटांतच सत्ताधारी व विरोधकांनी मंजुरी दिली.