गडहिंग्लज :
गडहिंग्लज शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या कोविड काळजी केंद्राला नगरपालिकेच्या विशेष सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या केंद्रासाठी ५ लाखांची ऑक्सिजन मशिनरी स्व:खर्चाने दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष महेश कोरी यांचे सत्ताधाऱ्यांसह विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनीही अभिनंदन केले.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेककर यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, सौम्य लक्षणे असणाऱ्या व राहत्या घरात अलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांची या केंद्रात काळजी घेतली जाईल. त्यांना मोफत औषधोपचार, जेवण, चहा-नाश्ता, समुपदेशन व मनोरंजन आदी सर्व प्रकारची सुविधा देण्यात येतील.
उपनगराध्यक्ष कोरी म्हणाले, पॅव्हेलियनच्या परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. तसेच कोविड रुग्णांना घरातून केंद्रात आणण्यासाठी खास वाहनाचीदेखील सोय करण्यात येईल.
विरोधी पक्षनेते हारुण सय्यद म्हणाले, शहरातील नागरिकांसाठी सर्वसोयीनियुक्त सेंटर सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चालाही आपण मंजुरी देत आहोत.
नितीन देसाई म्हणाले, कोविड केंद्राच्या परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
दीपक कुराडे म्हणाले, कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय असणाऱ्या रुग्णवाहिकेची सोय करावी.
सभेस सर्व नगरसेवक व खातेप्रमुख उपस्थित होते.
---------------------
* उपनगराध्यक्षांचे अभिनंदन
कोविड काळजी केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार आणि ५ लाखांची ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशिनरी केंद्रात उपलब्ध करून दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या अभिनंदनचा ठराव नरेंद्र भद्रापूर यांनी मांडला. विरोधी पक्षनेते हारुण सय्यद यांनी त्याला अनुमोदन दिले.