इचलकरंजी : येथील आयजीएम दवाखान्याकडे सामान्य रुग्णालय सुरू करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने मंगळवारी २०९ पदांच्या निर्मितीस मान्यता देण्याचा अध्यादेश जारी केला. १७ जानेवारी रोजी १५७ पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे आता या सामान्य रुग्णालयाकडे एकूण ३६६ पदांची निर्मिती झाली असून, लवकरच हे रुग्णालय सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
नगरपालिकेकडील आयजीएम दवाखान्याकडे रुग्णसेवा देण्यासाठी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने पालिकेस हा दवाखाना चालवणे अवघड झाले होते. त्यामुळे दवाखाना राज्य शासनाने हस्तांतरीत करून घ्यावा, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन ३० जून २०१६ रोजी दवाखाना शासनाकडे हस्तांतरीत करून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, याच प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीमध्ये शासनाकडून दवाखाना वर्ग करून घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्याप्रमाणे २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासनाच्या आरोग्य विभागाने दवाखाना हस्तांतरीत करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
नगरपालिकेने आयजीएम दवाखान्यासाठी मार्च २०१७ पर्यंत आर्थिक तरतूद केली होती. त्याप्रमाणे दवाखान्याकडे असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांचे वेतन मार्चअखेर देण्यात आले. मात्र, दवाखाना शासनाने वर्ग करून घेतला तरी त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती. परिणामी एप्रिल २०१७ पासून दवाखान्याकडे असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांचे पगार थकीत आहेत. दवाखाना वर्ग झाला तरी तो सक्षमपणे व पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी आमदार हाळवणकर यांनी शासनाकडे प्रयत्न चालूच ठेवले आहेत.
शासनाकडे आयजीएम दवाखान्यासाठी आर्थिक तरतूद करण्याकरिता मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. अखेर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे जून २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत आर्थिक तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले. अशाप्रकारे ‘आयजीएम’कडे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली व १७ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अध्यादेशात १५७ पदांची निर्मिती झाली. आता त्यानंतर मंगळवारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या अध्यादेशात आणखीन २०९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली. अशाप्रकारे आता या रुग्णालयासाठी ३६६ पदांची निर्मिती झाली आहे.५३ जण दहा महिने वेतनाच्या प्रतीक्षेतआयजीएम दवाखान्याकडून शासनाकडे दवाखाना हस्तांतरीत होताना त्यावेळी असलेल्या ५३ वैद्यकीय अधिकारी-कर्मचाºयांना आरोग्य खात्याने समावेश करून घेतले आहे. मात्र, गेली दहा महिने त्यांना वेतन मिळाले नसल्यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. परिणामी, या सर्वांना आरोग्य विभागाकडून वेतन मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा हा प्रश्न अद्यापही अधांतरी आहे.अतिदक्षता व ट्रामा केअर युनिटआयजीएम सामान्य रुग्णालयाकडे आता बाह्यरुग्ण विभागाबरोबर आंतररुग्ण पुरुष व स्त्री असे स्वतंत्र विभाग सुरू होणार आहेत. याशिवाय अतिदक्षता विभाग, नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग, मनोविकृती चिकित्सा कक्ष, जळीत रुग्ण कक्ष, ट्रामा केअर युनिट, सीटी स्कॅन, अपंग पुनर्वसन केंद्र असेही विभाग सुरू होणार आहेत, असेही मंगळवारच्या अध्यादेशात नमूद केले आहे.वैद्यकीय अधीक्षकांची प्रमुख म्हणून घोषणाशासनाच्या मंगळवारच्या अध्यादेशामध्ये सामान्य रुग्णालयाकडे असलेले वैद्यकीय अधीक्षक हे कार्यालयप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्याचबरोबर १५७ पदांपैकी समावेशनाने ५३, विभागामार्फत १०२ व कंत्राटी पद्धतीने दोन पदे भरावयाची आहेत.त्याचप्रमाणे मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या २०९ पदांपैकी ६३ पदे नियमित, ८७ पदे कुशल व ६९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.