एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूरपोलिस मुख्यालय परिसरातील पोलिस उद्यानाचे नूतनीकरण करून तेथे देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी मान्यता दिली. पोलिस उद्यानासह ध्वजस्तंभ उभारणीसाठी एक कोटी निधीची तरतूद करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. १ मे रोजी त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वत: पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे. पोलिस उद्यानाची दुरवस्था पाहून नांगरे-पाटील यांनी त्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरला येणारे पर्यटक पोलिसांचे उद्यान पाहून भारावून जातील, अशी रचना करणारा आराखडा बनविला आहे. भारतात झारखंडमध्ये रांची येथे सर्वाधिक २९६ फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. कोल्हापुरात ३०० फूट उंचीचा हा स्तंभ उभारण्याचा निर्णय झाला असून, त्यासंबंधीची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी २० नोव्हेंबर २०१६ रोजी केली. त्यानंतर नांगरे-पाटील यांनी स्तंभ उभारणीच्या आराखड्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक माथूर यांना पाठविला. त्यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. उद्यानातील प्रशस्त जागेत हा ३०० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून या स्तंभावर फडकणारा तिरंगा लक्ष वेधून घेणार आहे.स्तंभाबरोबरच उद्यानात व्यासपीठाच्या मागील बाजूस तिरंगी ध्वजाच्या रंगांचे महत्त्व विशद करणारी भित्तिचित्रे (म्युरल्स) उभारण्यात येणार असून, त्यावरून पाणी खाली सोडण्यात येणार आहे. तिथे वाहतूक प्रशिक्षण, शस्त्रे व पोशाख प्रदर्शन, आदींचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी निधीची आवश्यकता आहे. गृहविभागाकडून काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. उर्वरित निधी हा लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे. उद्योग-व्यावसायिकांचा पुढाकारध्वजस्तंभ उभारणीसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी औद्योगिक क्षेत्रातील काही व्यावसायिकांची बैठक घेतली. स्तंभ उभारणीमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी निधी द्यावा, असे त्यांनी आवाहन केले. त्याला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एका प्रथितयश कंपनीने ध्वजस्तंभासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश दिला.
ध्वजस्तंभास महासंचालकांची मान्यता
By admin | Published: January 23, 2017 12:12 AM