कोल्हापूर : कोल्हापुरात फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी जाहीर केला. गेल्या काही वर्षापासून क्रीडा प्रबोधिनी होण्यासाठी फुटबॉल खेळाडूंकडून सातत्याने मागणी होती. प्रबोधिनीमुळे फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया फुटबॉल क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.क्रीडामंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. क्रीडामंत्री भरणे म्हणाले, कोल्हापूर कुस्तीसह फुटबॉल खेळासाठी प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी होण्याची मागणी होती. या मागणीचा, फुटबॉल खेळाडूंचा, फुटबॉलप्रेमींचा आदर करून फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्त्वत: मान्यता दिली.या निर्णयामुळे फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून, नामवंत खेळाडू घडण्यासाठीही प्रबोधिनी उपयुक्त ठरेल. म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यात, काही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात, गणवेश दर्जा, प्रशिक्षक मानधन, भोजन दरात वाढ करावी, असा निर्णयही झाला.
खेळाडूंचे प्रमाणपत्र पडताळणीकायाकिंग कनोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आदेशही क्रीडामंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
पूर्ण क्षमतेने कार्यरत करा, प्राधिकरणसारखे भिजत घोंगडे नकोकोल्हापूर : कोल्हापुरात फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचे निर्णयाचे फुटबॉलपटूकडून स्वागत झाले. राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने १९९६ मध्ये कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीत कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रांना मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर फुटबॉलचे निवासी केंद्र पुणे येथे हलविले. आता पुन्हा कोल्हापुरात प्रबोधिनी सुरू करण्याची मान्यता दिल्याने फुटबॉलप्रेमींकडून या निर्णयाचे स्वागत झाले.पुणे येथे स्थलांतरित झालेले हे केंद्र कोल्हापुरात पुनःस्थापित करण्यासाठी काही क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा कार्यालयासमोर आंदोलन केले होते. कोल्हापूरच्या पेठापेठांत फुटबॉलचे संघ आणि खेळाडू आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांत फुटबॉल लोकप्रिय असून, शासकीय क्रीडा स्पर्धात अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्पर्धांतून खेळले आहेत. काही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळण्याची संधी मिळाली आहे.फुटबॉलला पोषक असे वातावरण कोल्हापुरात असल्याने १९९६ मध्ये क्रीडा विभागाने कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीत कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रांना मंजुरी दिली. त्यानुसार ही केंद्रे कोल्हापुरात सुरू झाली. मात्र, फुटबॉल केंद्र क्रीडा व युवक संचालनालयाने पुणे येथे स्थलांतरीत केले. त्यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाच्या विकासाला ‘खो’ बसला.
प्रबोधिनीमुळे पुन्हा चालनाक्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी राज्यभरातून निवड चाचणी केली जाणार आहे. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांची निवड केली जाणार आहे. या नवोदित खेळाडूंना योग्य आहार, व्यायाम, फुटबॉलची नवनवीन तंत्रे यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षणाची सुविधा प्रबोधिनीत उपलब्ध होणार आहे. विकासाला चालना मिळणार असून खेळाडूंना अधिक दर्जेदार बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उत्तम दर्जेदार खेळाडू तयार होऊन त्यांना राज्यातील, देशातील नामवंत फुटबॉल संघांत आणि राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.तत्वत: मान्यताशासनाने प्रबोधिनीला फक्त तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी काही निधी, प्रशिक्षक, जागा याबद्दलची कोणतीच तरतूद केलेली नाही. तत्वत: मान्यता दिलेले अनेक प्रश्न नंतर वर्षानुवर्षे भिजत पडले आहेत. तसे या प्रबोधिनीचे होऊ नये, अशीही अपेक्षा फुटबॉलप्रेमींतून व्यक्त झाली.
प्रबोधिनीत किमान ५० नवोदित फुटबॉलपटूंची सोय होणार आहे. शासकीय सर्व सुविधा त्यांना उपलब्ध होतील. त्याचा फायदा संबधित खेळाडूला होणार आहे. - प्रकुल पाटील, सी लायसन्स प्रशिक्षकज्या खेळाडूंकडे टँलेट आहे, मात्र त्यांना आर्थिक पाठबळ नाही, त्यांना क्रीडा प्रबोधिनी वरदान ठरणार आहे. विशेषत : ग्रामीण भागातील नवोदित फुटबॉलपटूंना मोठा फायदा होणार आहे. अनेकांचे करिअर पूर्ण होण्याची स्वप्न पूर्ण होणार आहे. - सतीश सूर्यवंशी, अध्यक्ष साई फुटबॉल महासंघ