गारगोटी : गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठअंतर्गत असलेल्या कर्मवीर हिरे महाविद्यालयास एम. कॉम. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी दिली.
२०२१-२२ या नवीन शैक्षणिक वर्षापासून कर्मवीर हिरे कला, शास्त्र, वाणिज्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालयात एम. कॉम. हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे.
या अभ्यासक्रमाला उद्योग, व्यावसायिक, बॅंकिंग, फायनान्स, माहिती तंत्रशिक्षण या क्षेत्रांत नियमित मागणी आहे.
नव्याने मंजुरी मिळालेल्या या अभ्यासक्रमामुळे भुदरगड, राधानगरी, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षणाची सोय होत आहे. हा अभ्यासक्रम चालू केल्याबद्दल सर्वत्र महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
या अभ्यासक्रमाच्या उपविभागात अकौंटिंग, ऑडिट, टॅक्स, बिझनेस मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, फायनान्स या विषयांचा समावेश असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. एम. कॉम, या पदव्युत्तर पदवी कोर्सला पहिल्यांदाच या भागामध्ये सुरुवात होत आहे.
या कोर्सच्या मंजुरीसाठी श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, संस्थेचे चेअरमन आशिष कोरगावकर, विश्वस्त मंडळ व संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. आर. डी. बेलेकर यांनी केले आहे.