कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सोमवारी आरोग्य विभागाच्या १९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र बांधकामांचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने होते. यावेळी कणेरी मठावर होणाऱ्या विविध विकासकामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.तुरंबे येथील वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने, हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील उपकेंद्र, १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन खोली दुरुस्ती व विस्तारीकरण, ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणे, म्हसवे (ता. भुदरगड), बानगे (ता. कागल), सुळे (ता. पन्हाळा) येथे आरोग्य पथकाची उपकेंद्र इमारत बांधणे, कसबा वाळवे, गवसे (ता. आजरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाचा यामध्ये समावेश आहे.जिल्ह्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे निवडे (ता. गगनबावडा), अंबप, हुपरी (ता. हातकणंगले), माळ्याची शिरोली, इस्पुर्ली (ता. करवीर), टाकळी (ता. शिरोळ), तुरंबे (ता. राधानगरी) अशा सात रुग्णवाहिका खरेदी कराव्या लागणार असून, यासाठी १ कोटी २६ लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच ७४ लाख रुपये देखभाल दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले आहेत.
या कामांनाही मंजुरी
- मागासवर्गीय वस्तीत रस्त्यावरील पोलसह एलईडी पुरविणे - १ कोटी ८ लाख ५० हजार रुपये
- सुरुपली (ता. कागल) गाव तलाव परिसरात रिटेनिंग वॉल बांधणे - ९७ लाख ६६ हजार रुपये
- सुरुपली गाव तलाव परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे - ९२ लाख रुपये
- वडगाव (ता. कागल) येथील भैरवनाथ मंदिराला संरक्षक भिंत बांधणे - ९७ लाख रुपये
- वडगाव (ता. कागल) येथील भैरवनाथ मंदिर पालखी मार्गावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे - ७७ लाख ७६ हजार रुपये
- कागल तालुक्यात सहा तालुक्यांच्या रस्ते कामांना मंजुरी
- महाराणी राधाबाई प्रशाला गडहिंग्लज येथे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यास मान्यता
- शिरोली ग्रामपंचायतीला घंटागाडी खरेदीसाठी १२ लाखांचे ग्रामविकास कर्ज मंजूर
- खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे समाज मंदिरासाठी जागा खरेदीसाठी १२ लाखांचे कर्ज मंजूर
- जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाकडील अनुदानित वसतिगृहांकरिता जिल्हा नियोजनमधून बंकबेड पुरविण्यासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली.
आज अधिकाऱ्यांची मुंबईत बैठककणेरी मठावर होणाऱ्या पंचमहाभुतांवर आधारित सुमंगल महोत्सवाच्या तातडीच्या कामांना मंजुरी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे काही अधिकारी रात्रीच मुंबईला रवाना झाले. तसेच नियोजन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनीही सोमवारी सकाळी व्हीसीद्वारे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी विविध प्रस्तावांबाबत चर्चा केली.