कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, यंत्रमाग मालक व कामगार संघटना तसेच इतर वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ मंडळींसोबतच्या बैठकीत हा निर्णय घेतला. याचा यंत्रमाग कामगारांना मोठा लाभ मिळणार आहे.
राज्यात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत, तर साडेचार लाख कामगार यंत्रमागाशी निगडित असून, ते असंघटित आहेत. त्यामुळे अद्यापही त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे, यासाठी वारंवार मागणी सुरू होती. त्यावर ही बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि माजी मंत्री राजेंद्र गावित या तीन विविध समित्यांनी सूचविलेल्या शिफारशी आणि नवीन सूचना मांडाव्यात, असे सांगितले. बैठकीत आमदार आवाडे यांनी, सुताच्या प्रतिकिलोवर सेस लागू करावा, त्यातून दरवर्षी ७०० ते ८०० कोटी रुपये जमा होतील. त्यातून या कामगारांना इएसआय सुविधा, सुट्टीचा पगार, रुग्णालय, बोनस, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण यासाठी येणारा खर्च मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी करता येईल. कामाचे स्वरूप कसे असेल, ते वर्षभर पाहूया. त्यानंतर त्यामध्ये काय बदल करायचा असल्यास तो करता येईल, असे मत व्यक्त केले.
आधीच्या तीन समितीचा व सध्या असणाऱ्या नवीन सूचनेचा विचार करून बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत एकमुखी घेतला आणि त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, आमदार प्रणिती शिंदे, अनिल बाबर, सुभाष देशमुख, मुनीफ इस्माईल, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नरसिंह आडम, नगरसेवक मदन कारंडे, अमित गाताडे, प्रधान सचिव विनिता वेदसिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ. अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, सतीश कोष्टी, विनय महाजन, महादेव गौड, कामगार नेते दत्ता माने, भरमा कांबळे यांच्यासह मालेगाव, भिवंडी, सोलापूर, सांगली व इचलकरंजी येथील मालक संघटना व कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चौकट
पाठपुराव्याला यश
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सर्वच कामगार संघटनांची मागणी होती. या मागणीचा प्रकाश आवाडे यांनी सुरुवातीच्या काळात पाठपुरावा केला. त्यानंतर सुरेश हाळवणकर यांनीही हा विषय लावून धरला, तर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्याकडे मदन कारंडे यांनी पाठपुरावा केला.
फोटो ओळी
१८०८२०२१-आयसीएच-०२
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, यंत्रमाग मालक व कामगार संघटना तसेच इतर वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ मंडळींसोबत बैठक घेतली.