आॅनलाईन लोकमत
मुंबई, दि. २५ : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील गोसावी झोपडपट्टीचे पुनर्वसन त्याच जागी करण्यासह या जागेवरील कन्या शाळा विस्तार व खेळाचे मैदान यांचे आरक्षण उठविण्यास मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे ७00 हून अधिक कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
इचलकरंजी मंजूर विकास आराखड्यानुसार अं.भू.क्र.१२५-अ येथील एकूण क्षेत्र १0,५0२ चौरस मीटर असून त्यापैकी अंशत: क्षेत्र आरक्षण क्रमांक ९0 नुसार कन्या शाळेसाठी ४९00 चौरस मीटर क्षेत्र आरक्षित केले आहे, तर उर्वरित क्षेत्र खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
या जागेवर गेल्या ६0 वर्षांहून अधिक काळात वसलेल्या ७00 झोपड्यांचे अन्यत्र पुनर्वसन करणे आर्थिक क्षमतेच्या बाहेर असल्याचे नगरपालिकेने शासनास कळविले होते. शासनाच्या झोपडपड्डी पुनर्वसन धोरणानुसार या झोपड्या १९९५ पूर्वीच्या असल्याने त्यांना संरक्षण मिळाले आहे. त्यानुसार झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आहे तीच जागा आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानुसार या मंत्रिमंडळ बैठकीत या जागेवरील शाळा आणि मैदानाचे आरक्षण हटवून तिथे झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आरक्षण ठेवण्यास मान्यता देण्यात आली.