मुंबई : मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील अन्य सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या व रखडलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पांना उभारी मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडून 'युनिफाईड बायलॉज च्या मसुद्याला तात्काळ मंजुरी देण्याची ग्वाही' नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व क्रिडाईच्या शिष्टमंडळाला दिली.खासदार मंडलिक यांनी क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सहा महिने रखडलेल्या युनिफाईड बायलॉजच्या मंजूरीसाठी ठाणे येथे मंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. यावेळी झालेल्या बैठकीतील चर्चेत या प्रश्नी तातडीने निर्णय घेणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.हा निर्णयामुळे कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायाला पुनरुज्जीवन मिळेलच, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी सह राज्य आणि शहरांच्या महसुलातही वाढ होईल. असे खासदार मंडलिक सांगितले.मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात खासदार मंडलिक यांनी म्हटले आहे की," राज्य शासनाने मुंबई वगळून संपुर्ण महाराष्ट्रामधील महानगरपालीका, नगरपरिषद, प्राधिकरण व रिजनल प्लॅन या सर्वांसाठी एकच बांधकाम नियमावली करण्याचे ठरवून युनिफाईड बायलॉज च्या नियमावलीचा अंतिम मसुदा तयार केला आहे. मात्र तो सहा महिने प्रलंबीत असल्याने शहरांचा विकास व महसूल थांबलेला आहे. त्यामुळे बांधकाम विभागासह सामान्य नागरिकांनाही अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हा बायलॉज तातडीने लागू झाल्यास बांधकाम व्यवसायामध्ये सुसूत्रता येणार असून त्यामुळे राज्याच्या आणि शहराच्या विकासाची दारे खुली होणार आहेत. तसेच यात नागरिकांचाही मोठा फायदा होणार आहे. राज्यातील कोल्हापूर सह अन्य १५ 'ड' वर्ग महानगरपालिका यामुळे फायदा होणार आहे."नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत खासदार संजय मंडलिक यांच्यासह, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र क्रीडाईचे अध्यक्ष राजीव पारेख, कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, देवरापुरकर ,रवीकिशोर माने, नितिन पाटील, अजय कोराणे, अॅड. सुरेश कुर्हाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.