कोल्हापूर : मनमानी कारभार आणि गैरकृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याविरोधातील अविश्वास ठराव गुरुवारी आठ विरुद्ध चार मतांनी मंजूर झाला.
आम्ही बहुमताने मेघराज यांना अध्यक्ष केले होते, आता बहुमतानेच त्यांना हटविले असून प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे कार्यभार दिला. लवकरच नवे पदाधिकारी निवडले जातील, असे महामंडळाचे कार्यवाह अभिनेते सुशांत शेलार यांनी सांगितले. शेलार हेच नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.कोरोना काळातील साखर चोरी, दोन लाखांच्या धनादेशाचा भरणा अशा वादग्रस्त विषयांच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक येथील शहाजी कॉलेजमध्ये झाली. बैठकीची सुरुवातच नाट्यमयरित्या झाली. बैठक दीड वाजता सुरू होताच संचालक बाळा जाधव यांनी राजेभोसले यांना संचालकांनी आपल्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला असून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. हा विषय विषयपत्रिकेवर आलेला नसल्याने हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगून राजीनामा देणार नसल्याचे अध्यक्ष राजेभोसले यांनी स्पष्ट केले. त्यावरून बैठकीत तब्बल पाच तास वादावादी व चर्चेचा घोळ सुरू राहिला.
शेवटी हा ठराव कायदेशीर व्हावा यासाठी ऐनवेळचा विषय म्हणून घेण्यात आला. उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सतीश बिडकर, सतीश रणदिवे, सुशांत शेलार, नीकिता मोघे, पितांबर काळे यांनी विरोधात तर खजिनदार संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, शरद चव्हाण, विजय खोचीकर यांनी अध्यक्षांच्या बाजूने मत दिले. अविश्वास ठरावानंतरही अध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने यमकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त नामंजूर करण्यात आले.सुशांत शेलार म्हणाले, साडेचार वर्षे आम्ही अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पण गेल्या काही महिन्यांत संचालकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने सुुरू असलेल्या कारभाराला यमकरने वाचा फोडली.यमकर म्हणाले, साखर चोरी, धनादेश अशा अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. माझे आणि बाळा जाधव यांचे संचालकपद रद्दचा प्रस्ताव अतिशय चुकीचा होती. आम्ही खरे होतो म्हणून संचालकांनी साथ दिली. या घडामोडी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या नाहीत.
निवडणूक आली म्हणून अविश्वास ठराव करून माझ्या पाठीत खंजीर खुपसला. सुशांत शेलार यांना अध्यक्ष व्हायचे आहे. संचालकांची कारस्थाने आणि बेकायदेशीर गोष्टी लपविण्याचे तसेच आर्थिक आमिषे दाखवून हे कारस्थान रचले गेले. तुमच्यात दम असता तर नोटीस काढून विषय घ्यायला हवा होता. मी राजीनामा दिलेला नाही आणि खचलेलो नाही. न्यायालयात दाद मागू-मेघराज राजेभोसले