इचलकरंजी : आपटे वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारा ‘इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार २०१९’ जाहीर करण्यात आला. प्रशांत असनारे यांच्या 'वन्स मोर' या काव्यसंग्रहास इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार व डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या 'वा! म्हणताना' या साहित्यकृतीस उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार जाहीर झाला.
त्याचबरोबर डॉ. अनघा केसकर (पुणे) यांच्या 'वार' कथासंग्रहाला, ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर (बोरगाव-सोलापूर) यांच्या 'यसन' कादंबरीला, बाळासाहेब पाटील (हालेवाडी-आजरा) यांच्या फास व रमा हर्डीकर-सखदेव (पुणे) यांच्या 'हां ये मुनकिन है' या दोन्ही अनुवादास विभागून पुरस्कार. उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कारामध्ये डॉ. नंदू मुलमुले (नांदेड) यांच्या 'संभ्रमाचे सांगाती' व तनुजा ढेरे (ठाणे) यांच्या 'मंतरलेली उन्हे' यांना विभागून पुरस्कार. उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कारामध्ये नचिकेत मेकाले (कंधार) यांच्या 'नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे जग' या साहित्य कृतीस, लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून संदीप धावडे (वर्धा) यांच्या 'वावरातल्या रेघोट्या', गणेश गोडसे (अकलूज) यांची 'पाणी घातल्या झाडांची पानगळ', विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृतीसाठी डॉ. लिली जोशी (पुणे) यांचे 'महाभारत व्यक्ती आणि संकल्पना', स्थानिक साहित्यिक गौरव पुरस्कारासाठी विमलपती जगदाळे यांना, तर उत्कृष्ट वाचक पुरस्कार माधवी कुलकर्णी यांना जाहीर झाला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, २००० रुपये, ३००० व ५००० रुपये असे आहे. सर्व पुरस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरपोच केले जाणार असल्याचे ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा हर्षदा मराठे यांनी सांगितले. यावेळी माया कुलकर्णी, कुबेर मगदूम, अॅड. स्वानंद कुलकर्णी, काशीनाथ जगदाळे, मोहन पुजारी, राजेंद्र घोडके, मीनाक्षी तंगडी, आदी उपस्थित होते.