कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननात सोमवारी सकाळी कुंडाच्या ओवरीची कमान निदर्शनास आली आहे. कुंडाचे सुरू असलेल्या पुनरुज्जीवनाच्या कार्यातील हे पहिले यश असून, येथील पाण्याचे झरे अजूनही जिवंत आहेत. याशिवाय एकाच आकारातील मोठे दगड सापडले असून, ते नेमके कोणत्या बांधकामाचे आहेत हे अद्याप कळालेले नाही.अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाशेजारील मुजविण्यात आलेल्या मनकर्णिका कुंडाचे उत्खनन गेले काही महिने सुरू आहे. मध्यंतरी कोरोना व पावसामुळे कामात व्यत्यय आला. नवरात्रौत्सवादरम्यान थांबविलेल्या या कामाला आता पुन्हा सुरुवात झाली आहे. कुंड ६० फूट खोल आणि ६० फूट रुंदीला आहे. त्यापैकी सध्या १२ फुटांपर्यंतचे खोदकाम झाले आहे.
या खोदकामांतर्गत सोमवारी सकाळी फूलवाल्यांच्या दुकानांच्या मागील बाजूस असलेल्या भिंतींमध्ये मनकर्णिका कुंडाच्या ओवरीची दगडी कमान आढळली आहे. खालीपर्यंत खोदकाम जात आहे तसे पाण्याचे झरेही जिवंत होत आहेत. याशिवाय उत्खननात मोठमोठे मात्र विशिष्ट आकार आणि डिझाईनमधले दगड सापडत आहेत. हे दगड मनकर्णिका कुंडाच्या बांधणीचाच एक भाग होते की केवळ भराव म्हणून टाकण्यात आले होते याबद्दल अद्याप कळलेले नाही. उत्खननाचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच कोल्हापूरकरांना कुंडाचे मूळ रूप पाहायला मिळेल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.