निंगाप्पा बोकडे चंदगड : गोवा, दोडामार्ग, विजघर, तिलारी, घाट मार्गे बेळगाव व कोल्हापूर गोवा जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक तिलारी घाटातून वाढली होती; पण अवजड वाहनांमुळे हा घाट धोकादायक बनल्याने अवजड वाहतुकीवर बंद व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दहा फुटी कमान दोन ठिकाणी उभारली आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतुकीवर चाप लागणार आहे.तिलारी घाटातून अवजड वाहने जाण्यास मनाई असताना ती वाहने घालून अनेक ठिकाणी कठडे तोडले. त्यामुळे मोठे अपघात घडले. तर वाहने अडकून घाट बंद होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या. यामुळे तिलारी घाटातून अवजड वाहने बंद करावी, अशी मागणी झाली असता सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. यानंतर त्यांनी जूनमध्ये अवजड वाहनांवर बंदी घातली आणि घाटाच्या माथ्यावर पायथ्याशी अवजड वाहने जाऊ नये, अशी कमान उभारावी, अशी सूचना दिली होती. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटाच्या पायथ्याशी तसेच माथ्यावर कोदाळीजवळ मुख्य रस्त्यावर तीन मीटर कमान उभी केली आहे. यामुळे दहा फुटांपेक्षा उंच वाहने यांना आता चाप लागला आहे. एसटी बसला देखील फटका बसला आहे.
तिलारी घाटात गेल्या काही महिन्यांत अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झाले. कित्येक तास घाट बंद होऊन वाहन धारक प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनांचे नुकसान झाले. बांधकाम विभागाने घाटात लाखो रुपये खर्च करून बांधलेले संरक्षण कठडे तोडले गेले. शिवाय तिलारी घाटात धोकादायक चढ-उतार, वळणामुळे अवजड वाहने सुटणे कठीण, शिवाय अवजड वाहनधारकांना अंदाज नसल्याने अनेक अपघात झाले होते. यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जून ते ३१ आक्टोबरपर्यंत तिलारी घाटातून बंदी घातली आणि एसटी बस सेवा बंद झाली आहे.
कमानीची उंची वाढवावीअवजड वाहनांना लगाम लावण्यासाठी दहा फुटी कमान उभारली; पण त्यापेक्षा उंच वाहन जाणार नाहीत, तसेच एसटी बस उंची बारा फूट असल्याने ती जाऊ शकणार नाही. यामुळे प्रवाशाचे हाल होणार आहेत. तेव्हा एसटी बस सुटली पाहिजे यासाठी बांधकाम विभागाने कमानीची उंची बारा फूट करावी, अशी मागणी केली जात आहे.