कोल्हापूर : आर्किटेक्टस्नी नवीन इमारतींची रचना करताना त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा यांसह सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांची रचना करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे बोलताना केले.येथील असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस यांच्या वतीने ‘वर्ल्ड आर्किटेक्चर डे’ व ‘इंजिनिअर्स डे’ संयुक्तपणे साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. शहरात उंच घरांची रचना करताना पर्यावरण संवर्धनाचा विचार करून पर्यावरणपूरक व्हर्टिकल गार्डनचा समावेश करावा, असेही देसाई यांनी सुचविले.अहमदाबाद येथील आर्किटेक्ट शीतल शाह यांच्या ‘फूटप्रिंट्स आॅफ विश्वकर्मा आणि लर्निंग फ्रॉम हिस्ट्री’ या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी शहा यांनी इतिहासापासून काय शिकता आले आणि आपण काय शिकले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले.कोल्हापुरात आलेल्या महापुरावेळी मदत व पुनर्वसन कार्यात योगदान दिल्याबद्दल आर्किटेक्टस् असोसिएशनचा सत्कार करण्यात आला. तो अध्यक्ष अजय कोराणे यांनी स्वीकारला.यावेळी शिरीष बेरी, सूरत जाधव, जीवन बोडके, संजय आवटे, अमरजा निंबाळकर, मोहन वायचळ, प्रमोद बेरी, बलराम महाजन, संदीप घाटगे, कृष्णा पाटील, महेश यादव, जयंत बेगमपुरे, राज डोंगळे, प्रशांत काटे, प्रमोद पोवार, अनिल घाटगे, गौरी चोरगे, इंद्रजित जाधव, वंदना पुसाळकर उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट वर्किंग कमिटीचे चेअरमन विजय कोराणे यांनी स्वागत केले. विजय चोपदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.