कोल्हापूर : पावसामुळे शहरातील बहुसंख्य डांबरी रस्ते खराब झालेले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता तपासली जात नसल्यामुळे एका वर्षातच रस्ते खराब होतात. महापालिकेचे अभियंता यांचे रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे. अधिकारी करतात तरी काय? अशी शब्दांत शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील खराब रस्त्यांबाबत सदस्यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.‘आयआरबी’ने केलेले रस्ते तसेच काही ठरावीक रस्ते चांगल्या दर्जाचे झाले आहेत. तर मग महापालिकेने केलेले रस्ते लवकर खराब का होतात, रस्त्यांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे? असा सवाल सत्यजित कदम, सचिन पाटील यांनी उपस्थित केला. डांबराचे प्रमाण कमी वापरले जाते. रस्ते दोन वर्षेही टिकत नाहीत. ज्या रस्त्यांवर वाहतूक जास्त आहे, त्या ठिकाणी मुरमाऐवजी कॉँक्रीटीकरण करून खड्डे मुजविता येतात याची माहिती घ्यावी अथवा नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे पावसाळ्यात डांबरीकरणाद्वारे खड्डा भरून घ्या, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.शहरात भटक्या गाई, कुत्री व घोड्यांची संख्या वाढलेली असून वॉर्डनिहाय नियोजन करून कारवाईची मोहीम राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावर बेवारस वाहनांची संख्या पुन्हा वाढलेली असून, त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना माधुरी लाड यांनी केली. महापालिकेच्या बऱ्याच शाळांमध्ये गळती असून, काही ठिकाणी दरवाजे खराब झालेले आहेत. शाळेच्या छताची स्वच्छता करून गळती थांबवा, अशी मागणी सविता भालकर यांनी केली.पाण्याची साडेतीन हजार मीटर बंदशहरात सुमारे ३४०० पाण्याची मीटर बंद असल्याची माहिती सभेत समोर आली. सदर मीटरचे क्रॉस चेकिंग करण्यात येईल.मीटर रीडरला कमिशन मिळत असल्याने पाणी मीटर बंद आहेत, असा शिक्का मारून मीटर बदलण्यास भाग पाडले जात आहे. संबंधित मीटर रीडरवर कारवाई करावी, अशी मागणी सविता भालकर यांनी सभेत केली. यापुढे स्थायी समितीमार्फत क्रॉस चेकिंग करण्यात येईल. जर यामध्ये कोणी चूक केली असेल तर त्यांंच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सभापती शारंगधर देशमुख यांनी दिला.