कोल्हापूर : मंगळ ग्रहाच्या अनेक रहस्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे भारतात बनवलेले यान मंगळाच्या दिशेने यशस्वीरीत्या पाठविले. त्याचा संदर्भ देणे भाग पडत आहे; कारण पृथ्वीपासून कित्येक मैल दूर असणाऱ्या मंगळावर यान पाठविण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च आला; तर कोल्हापूर शहरांतर्गत ४९ कि.मी. लांबीचे निकृष्ट व अपूर्ण रस्ते करण्यासाठी ‘आयआरबी’ कंपनी ४५० कोटी रुपये खर्च आल्याचे सांगत आहे. शिवाय, काही कारभारी मंडळींना हाताशी धरून तो खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करण्याच्या नादात आहे. त्यामुळे मंगळापेक्षा कोल्हापुरातील अंतर्गत रस्ते लांब आहेत काय? असा सवाल माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. टोलवसुलीबाबत कोल्हापूरची जनता कधीच गप्प बसणार नसून, आमचा याबाबत आजपर्यंत विरोध होता आणि तो यापुढेही राहणार आहे. आयआरबी टोलवसुली झाली नाही म्हणून १७० कोटी रुपयांचे नुकसान झाले म्हणते; तर ३० वर्षांपर्यंत कोल्हापूरकडून किती वसूल करणार हे त्यांनी आताच जाहीर करावे. त्यांची मग्रुरी आता सर्वांनी एकत्रितपणे मोडून काढण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मंगळापेक्षा कोल्हापुरातील अंतर्गत रस्ते लांब आहेत का?
By admin | Published: September 26, 2014 12:23 AM